Keiron Pollard Leading Run Scorer in T20: कायरन पोलार्डने टी-२० इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात उमटवलं आहे. पोलार्डने मेजर लीगमधील क्रिकेट सामन्यात शतक झळकावत विश्वविक्रम रचला आहे. मेजर लीग क्रिकेटमधील २१ जूनला वॉशिंग्टन फ्रिडम आणि एमआय न्यूयॉर्क हे संघ आमनेसामने होते. पोलार्डने एमआय न्यूयॉर्ककडून खेळताना ही शतकी खेळी साकारली आणि यासह त्याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला मागे टाकत जगातील नंबर वन फलंदाज ठरला.

कायरन पोलार्डने वॉशिंग्टन फ्रिडम संघाविरूद्ध खेळताना ५६ चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांसह १७८.५७च्या स्ट्राईक रेटने वादळी शतक झळकावलं. या शतकासह कायरन पोलार्ड टी-२० इतिहासात सर्वाधिक धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने ख्रिस गेलला मागे टाकलं असून पहिलं स्थान गाठलं आह. कायरन पोलार्ड आता १४५८२ धावांसह टी-२० इतिहासात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

वॉशिंग्टन फ्रीडम संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २४५ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनने ६८ चेंडूत ११ चौकार आणि १३ षटकारांसह १५५ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. स्टीव्हन स्मिथ (२७) आणि मार्क चॅपमन (२३) यांनी ओवेनला साथ दिली. टी२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम ओवेनच्या खेळीमुळे मोडला जाणार अशी चिन्हं होती. मात्र कार्बिन बॉशने त्याला बाद केलं.

प्रत्युत्तरादाखल खेळताना एमआय न्यूयॉर्क संघाने २१५ धावांची मजल मारली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत कायरेन पोलार्डने ११ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०० धावांची थरारक खेळी केली. आयपीएल स्पर्धेत प्रशिक्षणाचं काम करणाऱ्या पोलार्डने अजूनही बॅटिंग विसरलो नसल्याचं आणि फिट असल्याचं सिद्ध केलं. या खेळीदरम्यान टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम पोलार्डच्या नावावर झाला. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. पोलार्डच्या नावावर आता टी२० क्रिकेटमध्ये १४४८२ धावा आहेत.

रोमारिओ शेफर्ड (२६) आणि कार्बिन बॉश (३५) यांनी उपयुक्त खेळी करत पोलार्डला चांगली साथ दिली. मात्र जिंकण्यासाठी या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. मुंबईचे आघाडीचे फलंदाजांपैकी क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मोनाक पटेल, कोरे अँडरसन हे मोठ्या खेळी करू शकले नाहीत. वॉशिंग्टन संघातर्फे ग्लेन मॅक्सवेलने २ विकेट्स पटकावल्या.