बर्लिन : केनियाच्या एल्युड किपचोगेने स्वत:चाच जागतिक विक्रम मोडून काढत बर्लिन मॅरेथॉनचे विजेतेपद मिळविले. किपचोगेने २ तास १.०९ सेकंद अशा वेळेसह अर्ध्या मिनिटाने आपला जुना विक्रम मोडीत काढला. कारकीर्दीत १७ मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्या किपचोगेचे हे १५वे विजेतेपद ठरले. यात दोन ऑलिम्पिक आणि १० अन्य शर्यतींचा समावेश आहे. तसेच बर्लिन मॅरेथॉनमध्ये त्याने चौथ्यांदा विक्रमी वेळेसह जेतेपद मिळवले. मॅरेथॉनसाठी अत्यंत पोषक अशा सरळ मार्गावर किपचोगेने मार्क कोरिरला पाच मिनिटांनी मागे टाकत अग्रस्थान पटकावले. त्याने सुरुवातीपासून घेतलेला वेग कायम राखला होता. त्याने पहिले १० किमीचे अंतर केवळ २८ मिनिटांत पार केले.

वयाच्या ३७व्या वर्षी किपचोगेने हे विजेतेपद मिळविले. या वयात जागतिक विक्रम मोडीत काढल्याने विजेतेपदाचा आनंद द्विगुणित झाला, असेही त्याने सांगितले. महिलांमध्ये इथियोपियाच्या तिगिस्ट अस्सेफाने २ तास १५ मिनिटे ३७ सेकंद अशी वेळ देत विजेतेपद मिळविले.