Indian athlete jailed in Kenya: स्वप्न मोठी असणं, यात काहीच चूक नाही. परंतु, त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना चुकीचा मार्ग अवलंबला तर संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळेच या प्रवासात मिळणारी दिशा, मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. असंच एक स्वप्न उराशी बाळगून हरियाणाच्या अमन मलिकने २०२३ साली वयाच्या १७ व्या वर्षी देशाच्या सीमा पार करून आफ्रिका गाठली. आता हा अमन मलिक कोण? हा प्रश्न अनेकांना पडू शकतो? आणि तेही साहजिकही आहे, अमन मलिक हा हरियाणाच्या सोनिपतमधील रहिवाशी. हरियाणातील अनेक युवकांप्रमाणे ऑलम्पिकच्या मैदानावर पराक्रम गाजवण्याचे त्याचेही स्वप्न होते, पण…

म्हणूनच या स्वप्नाला आकार देण्यासाठी लांब पल्ल्याचा धावपटू असलेल्या अमनने केनियातील इटेन शहर गाठले. जगभरातील धावपटूंसाठी इटेन हे शहर त्यांच्या ध्येय पूर्तीकडे घेऊन जाणारे शहर आहे. मात्र, ऑलिम्पिकच्या स्वप्नांकडे नेणारा हा प्रवास पुढे जाऊन इतकं भयावह वळण घेईल, याची कल्पनाही अमनने किंवा त्याच्या कुटुंबाने कधीच केली नव्हती.

अमन आणि इटेनची चर्चा का?

दोन वर्षांपूर्वी अमनने इटेन गाठले खरे परंतु, २०२५ साली १९ वर्षांच्या अमनला नैरोबी येथील न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. केनियन खेळाडूंना बंदी घातलेले पदार्थ पुरवणाऱ्या एका संघटित नेटवर्कचा तो भाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सध्या ३० कैद्यांना ठेवण्यात आलेल्या चार खोल्यांच्या एका बंदिस्त जागेत अमन दिवस काढत आहे. इथे त्याला दररोज एक तास मोबाईल फोन वापरण्याची परवानगी मिळते. द इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भात त्याच्याशी संपर्क साधला. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तो म्हणाला, “ते माझ्या खेळण्यावर बंदी घालू शकले असते किंवा भारतात परत पाठवू शकले असते… मी भारतातही तुरुंगवास भोगू शकलो असतो.” एकूणच अमनला विदेशात शिक्षा भोगावी लागतेय याची खंत आहे.

इटेन हे शहर वादाच्या भोवऱ्यात का अडकले?

इटेन हे शहर केनियाच्या ग्रेट रिफ्ट व्हॅलीमध्ये वसलेले आहे. या शहरात प्रशिक्षण झालेल्या असंख्य जागतिक व ऑलिम्पिक विजेत्यांमुळे हे शहर ‘अॅथलिट चॅम्पियन्सचे घर’ म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये ८०० मीटर प्रकारातील ऑलिम्पिक व जागतिक विक्रमधारक डेव्हिड रुडीशा, तसेच अनेक वेळा ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपदांची सुवर्णपदके पटकावणारी बीअ‍ॅट्रिस चेबेट यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. मात्र अलीकडच्या काळात हे शहर डोपिंग नियमभंगाच्या वाढत्या घटनांशी झुंजते आहे. खेळात नैसर्गिक क्षमतेऐवजी औषधांच्या जोरावर आघाडी मिळवण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे डोपिंग नियमभंग होय.

छापा आणि अटक

इटेन या शहरात अमन दोन वर्षांनंतर प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतण्याच्या वाटेवर असताना केनियाच्या डायरेक्टोरेट ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्सच्या (DCI) अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्याच्या खोलीवर छापा टाकला. केनियन न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अमनकडे “प्रतिबंधित पदार्थ, सप्लिमेंट्स आणि औषधांनी भरलेली संपूर्ण एक सुटकेस” सापडली. या प्रतिबंधित पदार्थांमध्ये ‘मेल्डोनियमचा’ समावेश होता. टेनिसमधील जागतिक स्तरावरील खेळाडू मारिया शारापोव्हा हिच्यावर २०१६ साली १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तिच्या डोपिंग चाचणीत मेल्डोनियम (Meldonium) हा प्रतिबंधित पदार्थ आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. लान्स आर्मस्ट्राँगच्या डोपिंग प्रकरणामुळे कुप्रसिद्ध ठरलेला ह्युमन ग्रोथ हार्मोन (HGH), तसेच डोपिंग चाचणीत प्रतिबंधित पदार्थ लपवण्यासाठी वापरला जाणारा मॅनिटॉल (masking agent) यांचाही त्यामध्ये समावेश होता. तसेच तपास अधिकाऱ्यांनी अमन आणि खेळाडू रुबिन मोसिन यांच्यातील एका पानाचा करारही जप्त केल्याचा आरोप आहे.

या करारानुसार, संबंधित खेळाडूने मिळवलेल्या बक्षिसाच्या रकमेपैकी ५० टक्के हिस्सा मिळण्याच्या बदल्यात, अमनने “आवश्यक ते सर्व” पुरवण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद करण्यात आले होते. छाप्यानंतर लगेचच अमनची इटेन येथील पोलीस ठाण्यात सुमारे एक तास चौकशी करण्यात आली. त्याचा पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, केनियाच्या अँटी-डोपिंग एजन्सीने (ADAK) निवेदन प्रसिद्ध करून त्यात अमनचा प्रतिबंधित पदार्थांच्या वितरण आणि वापरात संभाव्य सहभाग असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतरच हा छापा टाकण्यात आला, असे जाहीर केले.

दोषी असल्याची कबुली

१२ सप्टेंबर २०२५ रोजी अमनने बेकायदेशीररीत्या औषधे आयात केल्याच्या एका आरोपासह, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याच्या तीन आरोपांमध्ये दोषी असल्याची कबुली दिली. या प्रतिबंधित पदार्थांमध्ये HGH इंजेक्शन्स, माइल्ड्रोनेट ५०० (मेल्डोनियम) आणि डायक्लोफेनॅक सोडियम इंजेक्शन्स यांचा समावेश होता. २६ सप्टेंबर रोजी त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुरुंगातील आयुष्य

तुरुंगवास सुरू झाल्यापासून अमनला घराची ओढ लागली आहे. तुरुंगातील रक्षकांच्या सूचना समजून घेण्यात येणारी अडचण, तसेच तुरुंगात परकेपणाची भावना यामुळे तो मानसिक तणावात आहे. याशिवाय, मक्यापासून बनवले जाणारे केनियातील मुख्य अन्न असलेले उगाली खाऊनही आता कंटाळल्याचे तो सांगतो. तुरुंगातील रुग्णालय विभागात त्याची ड्युटी असून, वैद्यकीय नोंदी सांभाळणे हे त्याच्या दैनंदिन कामांपैकी एक आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तो आणि इतर कैदी पुन्हा आपल्या कोठड्यांमध्ये परततात. दररोज सायंकाळी ६.३० ते ७.३० (स्थानिक वेळेनुसार) या एक तासाच्या कालावधीत त्याला फोन करण्याची परवानगी मिळते. तो फोनवर आपल्या विधवा आईला धीर देतो. त्याचे वडील, हरियाणा पोलीस दलात उपनिरीक्षक होते, ते हयात नाही. तो तीन भावंडांपैकी सर्वात लहान आहे. त्याचा मोठा भाऊ मुंबईत बॉलीवूडमध्ये करिअर घडवण्याच्या प्रयत्नात आहे, तर त्याची बहीण लग्नानंतर कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे.

एका पानाचा करार

द इंडियन एक्स्प्रेसशी फोनवर झालेल्या संभाषणांदरम्यान अमनने आपण निरपराधी असल्याचे सांगितले. तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या एका पानाच्या कराराबाबत विचारले असता, त्याने ठामपणे सांगितले की, त्याच्यात आणि मोसिन यांच्यातील त्या कराराची कधीच अंमलबजावणी झाली नाही. “करार असला तरी मी कुणालाही (औषधे) पुरवली नाहीत. छापा टाकण्यात आला तेव्हा मी केनियात नुकताच आलो होतो. केनियन खेळाडूंना प्रतिबंधित पदार्थ देणारा मी नाही. मी चाचणीसाठी दोन नमुने दिले होते, पण त्यांचे निकाल मला कधीच कळवण्यात आले नाहीत. ज्याला मी औषधे दिल्याचा आरोप आहे, त्या खेळाडूचीही चाचणी झालेली नाही,” असा दावा तो करतो. जप्त करण्यात आलेली औषध पाठवणाऱ्या भारतातील ‘मित्रा’चे किंवा सल्ला देणाऱ्या ज्येष्ठ खेळाडूंची नावे न सांगता, अमन म्हणतो की, HGHच्या फायद्यांबाबत ज्येष्ठ खेळाडूंनी दिलेला सल्ला ऐकून त्याने चूक केली, याची त्याला खंत आहे. मात्र, त्याच्या शिक्षेच्या आदेशात अमनकडे प्रतिबंधित पदार्थ आणून देणाऱ्या व्यक्तीचे (अवदेश नगर) नाव स्पष्टपणे नमूद केलेलं आहे.

अवदेश नगर

माजी मध्यम अंतर धावपटू असलेला अवदेश नगर आज सुमारे तीन लाख फॉलोअर्स असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ओळखला जातो. इटेन व रशियातील प्रवास, केनियन खेळाडूंचे प्रशिक्षण आणि सप्लिमेंट्सविषयीचे व्हिडीओ-पोस्ट्स यांमुळे तो ऑलिम्पिकसाठी इच्छुक असलेल्या धावपटूंमध्ये लोकप्रिय झाला. २०१७ साली नैरोबी येथे झालेल्या अंडर-१८ जागतिक स्पर्धेत १,५०० मीटरमध्ये दहावे स्थान मिळवणारा नगर २०१८ मध्ये दुखापतीमुळे खेळातून बाहेर पडला. अमन इटेनला गेल्यानंतर एका सामायिक मित्रामार्फत त्याची नगरशी ओळख झाली आणि इटेनमध्ये स्थायिक होण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा नगर करतो. अमनसाठी आणलेले एक पार्सल आपण नेले होते, मात्र त्यातील मजकूर आपल्याला माहिती नव्हता, असेही तो सांगतो.

न्यायालयीन कागदपत्रांमध्ये आपले नाव अमनचा प्रशिक्षक म्हणून नमूद झाल्याबाबत नगरचे म्हणणे आहे की, इन्स्टाग्रामवर टाकलेले काही व्हिडीओ याला कारणीभूत ठरले. “इटेनमध्ये अमन सराव करत असतानाचे काही व्हिडीओ मी शूट केले होते आणि त्याला ‘माझा प्रशिक्षणार्थी, माझा विद्यार्थी’ अशी कॅप्शन दिली होती. अमनला आणि इतर तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून ते पोस्ट केले होते. केनियन पोलिसांनी हे व्हिडीओ पाहून मीच त्याला औषधे देणारा प्रशिक्षक असल्याचा निष्कर्ष काढला. अमन संदर्भात बोलताना त्याने सांगितले की, त्याने माझे नाव कधीही घेतलेले नाही,” असे नगर सांगतो.

अमनचे वकील काय सांगतात?

अमनचे विनामूल्य (प्रो बोनो) वकील डेव्हिड लुस्वेती नमाई यांचे मत आहे की, अमनच्या प्रकरणात परिस्थिती प्रतिकूल ठरली. निकालाच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय स्तरावर अँटी-डोपिंग कारवायांना वेग आलेला असताना, अमनची सुटका झाली असती तर ते चुकीचे संकेत देणारे ठरले असते. त्यामुळे सरकारी वकिलांशी प्ली बार्गेन करून किमान शिक्षेच्या बदल्यात दोषी असल्याची कबुली देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे सहा-सात वर्षांच्या ऐवजी तीन वर्षांची शिक्षा एकत्रितपणे भोगावी लागणार आहे. आता अमनसाठी राष्ट्रपतींकडून दयेच्या याचनेच्या मागणीला मान्यता मिळावी यासाठी नमाई प्रयत्नात आहेत. दरम्यान, नैरोबीतील भारतीय उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून त्याला भारतात परत पाठवण्याबाबतही प्रयत्न करण्याचा विचार ते करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अमनला शिक्षा भोगण्यासाठी भारतात परत पाठवणे हे केवळ दोन देशांमध्ये द्विपक्षीय करार झालेला असेल तरच शक्य असते. आणि सध्या भारत व केनिया यांच्यात असा कोणताही करार नाही. मात्र, केनियन कायद्यांनुसार त्याची योग्य काळजी घेतली जावी, यासाठी तुरुंग प्रशासनाकडे औपचारिक विनंती करण्यात आली आहे; भेटीदरम्यान अमन निरोगी असल्याचे आणि त्याच्यावरील आरोपांची त्याला पूर्ण जाणीव असल्याचे आढळून आले.