Kerala Premier League 2026, Viral Video: सध्या केरळमध्ये केरळ प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात कॅलिकट ग्लोबस्टार्स आणि थ्रिसूर टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दोन्ही संघांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. या दरम्यान कर्णधार अखिलने दमदार अर्दशतकी खेळी केली. तर शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना, ए.के. अर्जुनने खणखणीत षटकार खेचला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मुख्य बाब त्याला नीट चालताही येत नव्हतं.

या सामन्यात थ्रिसूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवून थ्रिसूरच्या गोलंदाजांनी कॅलिकट संघातील फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. थ्रिसूर संघाकडून गोलंदाजी करताना सरथ चंद्र प्रसादने दमदार गोलंदाजी केली. त्याने ३ षटकात अवघ्या ८ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केल्या. कॅलिकट संघाकडून फलंदाजी करताना एस निझारने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर आर कुन्नुम्मलने ४३ धावा आणि ए बसिथने २१ तर ए स्केरियाने १९ धावा करून संघाची धावसंख्या ५ गडी बाद १४६ धावांवर पोहोचवली.

थ्रिसूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना थ्रिसूर संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख फलंदाज ओमर अबुबकर स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अहमद इम्रान आणि शॉन रॉजर यांनी मिळून संघाचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी मिळून ६५ धावांची भागीदारी केली. इम्रानने ४५ धावांची खेळी केली. तर ८२ धावसंख्येवर शॉन रॉजर २८ धावा करून माघारी परतला. पण कर्णधार एमएस अखिलने दमदार खेळी करून विजय खेचून आणला. अखिलने मोठे फटके खेळून आपल्या संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं.

शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज

तर झाले असे की, थ्रिसूर संघाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजी करण्यासाठी अर्जुन फलंदाजीला आला. त्याला नीट चालताही येत नव्हतं. पण दुखापतग्रस्त असूनही तो आपल्या संघासाठी लढला. लंगडत तो खेळपट्टीवर आला आणि शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने जर चौकार खेचला असता, तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण त्याने षटकार खेचून आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. या षटकारास थ्रिसूर संघाने ४ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. यासह गुणतालिकेत तिसरं स्थान पक्क केलं.