Keshav Maharaj Bowled 40 Consecutive overs in Test Cricket : त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पावसाने व्यत्यय आणलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३५७ धावा केल्या, तर विंडीजचा संघ २३३ धावांवरच मर्यादित राहिला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ३ बाद १७३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या संघाला पाच विकेट्सवर केवळ २०१ धावा करता आल्या आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने मोठा पराक्रम केला.

केशव महाराजने टाकला कसोटीत दुसरा सर्वात मोठा स्पेल –

३४ वर्षीय फिरकीपटूने पहिल्या डावात ७६ धावांत चार आणि दुसऱ्या डावात ८८ धावांत चार विकेट्स घेतल्या. त्याने सामन्यात ६६.२ षटके टाकली आणि १६४ धावांत ८ विकेट्स घेतल्या. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दुसरा सर्वात मोठा स्पेल टाकला. त्याने २४० चेंडू म्हणजे ४० षटके सलग टाकली. रे प्राइसनंतरचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा स्पेल आहे. आता त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार सामन्यांत १७.८५च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही फिरकीपटूने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामन्यात इतक्या विकेट्स घेतल्या नाहीत.

हा पराक्रम करणारा केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फिरकी गोलंदाज –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, दक्षिण आफ्रिका संघासाठी केशव महाराजने दमदार गोलंदाजी केली, ज्यात यजमान संघाला पहिल्या डावात २३३ धावावंर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केशवने ४० षटकांच्या गोलंदाजीमध्ये १५ षटके मेडन्स टाकली, तर ७६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यासह केशव महाराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये २५० विकेट्स पूर्ण केल्या आणि असे करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इम्रान ताहिरने ही कामगिरी केली होती. इम्रानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटसह एकूण २९१ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार? कुस्तीच्या नियमातील ‘ही’ त्रुटी विनेशच्या प्रकरणाला देणार वळण

केशव महाराजची परदेशातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याने २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या व्यतिरिक्त, ह्यू टेफिल्ड आणि पॉल ॲडम्स हे दक्षिण आफ्रिकेचे एकमेव फिरकीपटू आहेत, ज्यांनी परदेशात कसोटीत तीन वेळा किमान आठ विकेट्स घेतल्या आहेत. इतर कोणत्याही दक्षिण आफ्रिकन फिरकीपटूने इतक्या वेळा अशी कामगिरी केलेली नाही.