धडाकेबाज फलंदाज आणि बंडखोर प्रवृत्तीचा केव्हिन पीटरसन आता इंग्लंड संघाचा मेन्टॉर असणार आहे. मात्र कारकिर्दीत फिरकीचा सामना कसा करावा हे कळेनासं झालेल्या पीटरसनने तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ असलेल्या राहुल द्रविडचा सल्ला घेतला होता.

राहुल द्रविड आणि केव्हिन पीटरसन हे आयपीएल स्पर्धेत २००९-१० हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी एकत्र खेळले होते. तेव्हापासून त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. २०१० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत धावांसाठी संघर्ष करावा लागल्यावर पीटरसनने फिरकीपटूंचा सामना कसा करावा यासाठी राहुल द्रविडकडे धाव घेतली. शकीब उल हसन, अब्दुर रझ्झाक यांच्याविरुद्ध खेळणं पीटरसनला कठीण जात होतं.

द्रविडने मला एक अतिशय सुरेख इमेल लिहिला. फिरकीपटूंचा सामना कसा करावा यासंदर्भात द्रविडने फार छान विषद करून सांगितलं. तेव्हापासून फिरकीला खेळतानाचा माझा दृष्टिकोनच बदलला. ‘केपी-द ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकात केपीने यासंदर्भात लिहिलं आहे.

द्रविडने लिहिलं, ‘चॅम्प- मी पुढे लिहिण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. तू ज्या गोलंदाजांचा उल्लेख केलास (शकीब उल हसन आणि अब्दुर रझ्झाक) त्यांच्याविरुद्ध मी खेळलो नाहीये. तू म्हणालास ज्या मालिकेत तुझ्या धावा झाल्या नाहीत ती मी पाहू शकलो नाही. त्यामुळे मी म्हणतोय त्या गोष्टींचा संदर्भ लागला नाही किंवा व्यवहार्य वाटल्या नाही तर सोडून दे. कोणालाही सल्ला देणं नेहमीच सोपं असतं. पण जोपर्यंत तुम्ही स्वत: त्या परिस्थितीला सामोरं जात नाही तोपर्यंत तुम्हाला काठिण्य पातळी लक्षात येत नाही. ती पातळी समजेपर्यंत समोरचा काय म्हणतोय ते लक्षात येत नाही’.

‘तू म्हणतोस ते फिरकीपटू वेगात चेंडू टाकतात आणि खेळपट्टी फिरकीला पोषक असेल तर कोणत्याही फलंदाजाला त्यांचा सामना करणं कठीणच आहे’.

‘वेगात चेंडू सोडणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना (मी लहानपणी अनिल कुंबळेचा सामना केला आहे) पुढे पाय टाकून खेळायचा माझा प्रयत्न असतो. मात्र तसं करताना पुढचा पाय भक्कमपणे रोवून उभं राहायचं नाही. आपण पुढे जाऊन खेळण्याच्या पवित्र्यात असतो. ते बरोबरच आहे. मात्र पुढे जाऊन सामना करण्याच्या प्रयत्नात, बॅकफूटवर असताना गोलंदाजाने बाद करू नये असा विचार असतो. अशावेळी फ्रंटफूटवर खेळताना पाय आधीच भक्कमपणे रोवला जातो. त्याने सगळंच गणित बदलतं. बॅट अत्यंत वेगाने खाली येते कारण फ्रंटफूटवर खेळायला जाताना पाय बराच आधी रोवला तर डोक्याला संकेत जातो आणि बॅटने चेंडू तटवला जातो. चेंडू जवळ येऊ देण्याऐवजी बॅट तिथपर्यंत जाते- हे मेंदूला संकेत मिळाल्याने होतं. चेंडू वळला तर तुम्हाला चेंडूपाठी जावं लागतं. तुम्ही ठरवलेल्या टप्प्यावर खेळता येत नाही. (तुम्ही किती वेळा चकलात याची कोणी नोंद ठेवत नाही) याची परिणती हार्ड हँड्स मध्ये होते. हे दुसरंतिसरं काहीही नसून दूर असलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जर तुमच्या शरीराचं वजन योग्य पद्धतीने विभाजित झालं आणि बॅट वेळेत खाली आली तर ते एकदम अचूक आहे. अशावेळी बॅट योग्य ठिकाणी असते.ऑस्ट्रेलियात अशा पद्धतीने खेळताना मला संघर्ष करावा लागला. माझं टायमिंग नीट नव्हतं. मी शरीरापासून दूर खेळत होतो. बॅट आणि बॉलमध्ये बरंच अंतर राहत असे. टायमिंगचं असंच आहे- ती एक क्लृप्ती आहे. टायमिंग कसं साधावं हे सांगता किंवा शिकवता येत नाही’.

असो, या सगळ्या गोष्टी अंतर्मनात मध्ये सुरू असतात आणि तुम्ही त्याबद्दल विचार करू शकत नाही.

‘सराव करताना काही गोष्टी करता येऊ शकतात. नेट्समध्ये गोलंदाजांच्या हाताकडे नीट पाहून कुठल्या टप्प्यावर चेंडू येईल याचा अंदाज घे. तुला चेंडू शेवटपर्यंत पाहण्याची सवय लागेल. पुढे जाऊन खेळण्यासाठी प्रयत्नशील राहा पण हेही खरं की धावा करण्याच्या सर्वाधिक संधी बॅकफूटवर खेळताना मिळतील. फ्रंटफूटवर जाताना एकदम अंतिम शब्द मानून जाऊ नकोस. सावध राहा. चेंडूकडे पाहणं आवश्यक आहे. गरज पडल्यास चटकन बॅकफूटवर जाऊन खेळता यायला हवं. त्या चेंडूवर धावाही करता यायला हव्यात’.

‘एक आणखी करता येऊ शकतं ते म्हणजे तुझ्या संघातील ग्रॅमी स्वॉन आणि मॉन्टी पानेसर यांच्याविरुद्ध पायाला पॅड्स न लावता किंवा गुडघ्याचं रक्षण करणारे पॅड्स घालून सराव करायचा. (हे कसोटी सामना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी वगैरे नको) जेव्हा बचाव करण्यासाठी पॅड नसतील तेव्हा चेंडू लागेल या भीतीने बॅट पुढे आणून खेळायचा प्रयत्न होईल. तुला शेवटपर्यंत चेंडूकडे लक्ष द्यावं लागेल. पायदेखील पॅडच्या रुपात बचावाची ढाल नसल्याने पुढे जाणार नाहीत. माझे प्रशिक्षक नेहमी सांगायचे की फिरकीचा सामना करण्यासाठी कधीही पॅड्सचा आधार लागू नये’.

‘केपी, तू एक दर्जेदार फलंदाज आहेस. तू चेंडू शेवटपर्यंत पाहा आणि त्यानुसार खेळ. स्वत:वर विश्वास ठेव. तू शांत राहिलास तर फिरकी असो किंवा वेगवान गोलंदाज- लाईन अँड लेंथ ओळखण्यास तुला मदत होईल. दडपणात असताना आपल्याला जे संकेत मिळतात त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तू बिट झालास आणि चेंडू वळून गेला तरीही तू खेळू शकतोस. आधीच्या चेंडूवर काय झालं हे तू विसरलास तरच पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळता येईल. तुला फिरकीचा सामना करता येत नाही असं कुणालाही म्हणू देऊ नकोस. सक्षमपणे फिरकीचा सामना करताना तुला पाहिलं आहे. तू पुढेही फिरकीविरुद्ध उत्तम खेळू शकशील’.

असो, फिरकीला कसं खेळायचं यावर मी तुझं डोकं वळणाऱ्या चेंडूपेक्षा जास्त गरगरवून टाकलं.

द्रविडचा सल्ला प्रमाण मानून पीटरसनने कारकिर्दीत त्यानंतर फिरकीपटूंचा यशस्वी सामना केला. आशियाई उपखंडात पीटरसनची कामगिरी उत्तम होण्यात द्रविडचा मोठा वाटा आहे. २०१२ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी त्यांनी कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या दौऱ्यात कर्णधार अॅलिस्टर कुकच्या बरोबरीने पीटरसनने मुंबईत शतकी खेळी साकारली होती. निवृत्तीनंतर समालोचनाकडे वळलेल्या पीटरसनने थोडा काळ आयपीएलमधल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेन्टॉर म्हणून काम पाहिलं होतं.