Kevin Pietersen England Cricket Return: Special White Ball Mentor Role: १२ वर्षांपूर्वी ज्यांच्यामुळे केविन पीटरसनची कमालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक संपुष्टात आली, त्याच खेळाडूसोबत आता पीटरसन पुन्हा काम करणार आहे. इंग्लंड क्रिकेटमध्ये केविन पीटरसनची तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एन्ट्री झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केविन पीटरसनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
केविन पीटरसनच्या खांद्यावर इंग्लंडच्या वनडे आणि टी-२० संघाचा स्पेशल मेंटॉर म्हणून जोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पीटरसनची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, १२ वर्षांपूर्वी ज्या खेळाडूमुळे पीटरसनचं शानदार आंतरराष्ट्रीय करिअर लवकर संपलं होतं, आता त्याच व्यक्तीसोबत पीटरसन काम करणार आहे. त्यामुळे त्याची ही पुनरागमनाची बातमी आणखी चर्चेत आली आहे.
पीटरसनने २०१४ मध्ये इंग्लंडकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता तो ब्रेंडन मॅक्क्युलमच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होणार असून, पुढील १२ महिने संघासोबत काम करेल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पीटरसन संघाला मार्गदर्शन करणार आहेत.
२०२७ चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. पीटरसनने दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं असून, तिथल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाची त्याला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्ये पीटरसनचा अनुभव इंग्लंडच्या संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
या नव्या भूमिकेबाबत पीटरसन म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रवासात संघाला मदत करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच पुन्हा इंग्लंडची जर्सी परिधान करणं हा माझ्यासाठी सन्मानाचा आणि भावूक करणारा क्षण आहे. आमच्याकडे अतिशय उत्कृष्ट व्हाइट-बॉल संघ आहे. या खेळाडूंसह मेहनत करून त्यांची क्षमता अधिकाधिक वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील १२ महिने ब्रेंडनच्या ‘थिंक टँक’चा भाग होणं ही माझ्यासाठी शानदार संधी आहे. मी कामाला सुरुवात करण्यासाठी आतुर आहे.”
मॅक्क्युलम यांनीही पीटरसनच्या नियुक्तीचं स्वागत केलं असून, विशेषतः इंग्लंडच्या फलंदाजांसाठी त्यांचा अनुभव खूप उपयुक्त ठरेल, असं म्हटलं आहे. मॅक्क्युलम म्हणाले, “KP आणि त्याने क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. इंग्लंडच्या क्रिकेटवर त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव, ज्ञान आणि क्रिकेटमधील स्थान पाहता त्यांनी या संघासोबत भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त करणं ही आमच्यासाठी शानदार गोष्ट आहे.”
