scorecardresearch

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा: महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंची सुवर्ण हॅट्ट्रिक

महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. मात्र, याच क्रीडा प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा: महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंची सुवर्ण हॅट्ट्रिक
(उमर अन्वर शेख (सुवर्णपदक), वैष्णवी ( कांस्य), देविका घोरपडे ( सुवर्ण), कुणाल घोरपडे ( सुवर्ण))

भोपाळ : महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. मात्र, याच क्रीडा प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले. यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राकडून शनिवारी देविका घोरपडे, कुणाल घोरपडे, उमर शेख (तिघे बॉक्सिंग) आणि सारा राऊळ (जिम्नॅस्टिक) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. सायकिलगमध्ये पूजा दानोळे, संज्ञा कोकाटेचे यश कायम राहिले. ॲथलेटिक्समध्ये रिले शर्यतीत मुलींनी सुवर्ण कामगिरी केली.

बॉक्सिंगमध्ये देविका, उमर, कुणालला सुवर्ण बॉक्सिंग प्रकारात महाराष्ट्राचे चार खेळाडू अंतिम फेरीत होते. यापैकी उमर अन्वर शेख, देविका घोरपडे, कुणाल घोरपडे या तिघा पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. उस्मान अन्सारीला पराभवाचा सामना करावा लागला. मुलांच्या विभागात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला. युवा जागतिक विजेत्या देविकाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तिने अंतिम लढतीत मध्य प्रदेशाच्या काफी कुमारीचा पराभव केला. मुलांच्या ४८ किलो वजन गटात उमरने पंजाबच्या गोपी कुमारला सहज नमवले. कुणालने ७१ किलो वजन गटात हरियाणाच्या साहिल चौहानला असेच पराभूत केले.

जिम्नॅस्टिकमध्ये सारा, आर्यनचे यश
जिम्नॅस्टिक प्रकारात सारा राऊळने सुवर्णपदक जिंकले. ठाणे येथे महेंद्र बाभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या साराने मुलींच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारात ३९.३३४ गुणांसह सुवर्णयश मिळवले. महाराष्ट्राच्या रियाला ३६.२६६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या वैयक्तिक प्रकारात आर्यन दवंडेने ‘फ्लोअर एक्सरसाईज’ प्रकारात रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राचाच मानन कोठारी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आर्यनने १२.०३३ गुणांची कमाई केली, तर माननचे ११.६३३ गुण होते. ‘व्हॉल्ट प्रकारात’ आर्यनने १३.१२ गुणांसह सोनेरी यश संपादन केले. मुंबईचा सार्थक राऊळने १२.६८ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. तालबद्ध प्रकारात ठाण्याच्या संयुक्ता काळेने ९५.२५ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

ॲथलेटिक्समध्ये पाच पदके
ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात मुलींनी ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. रिया पाटील, इशिका इंगळे, गौरवी नाईक, ईशा रामटेके या चौघींनी ४९.०७ सेकंद वेळ देताना सोनेरी यश संपादन केले. मुलांच्या चमूला ४२.४१ सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महेश जाधव, संदीप गोंड, ऋषिप्रसाद देसाई, सार्थक शेलार यांचा या चमूत समावेश होता. मुलींच्या ३ हजार मीटर शर्यतीत कोल्हापूरच्या सृष्टी रेडेकरने रौप्यपदक मिळवले. मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत कोल्हापूरचा सार्थक शेलार (१३.८२ सेकंद) रौप्य, तर संदीप गोंड (१३.९५ सेकंद) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सायकिलगमध्ये पूजा, संज्ञाची छाप
सायकिलगच्या ट्रॅक प्रकारात कोल्हापूरच्या पूजा दानोळे आणि मुंबईच्या संज्ञा कोकाटे यांनी सलग तिसऱ्या पदकाची नोंद केली. ‘केरिन’ प्रकारात संज्ञा रौप्य, तर पूजा कांस्यपदकाची मानकरी ठरली. ‘ट्रॅक’ प्रकारात महाराष्ट्राने आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 03:38 IST