khelo india youth games inaugurated at bhopal by union minister anurag thakur zws 70 | Loksatta

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा : खेळाडूंनी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा -अनुराग ठाकूर

उद्घाटन सोहळय़ात अविनाश साबळे व निखहत झरीन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा : खेळाडूंनी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा -अनुराग ठाकूर
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचे भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात शानदार सोहळय़ात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले.

भोपाळ : गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडा वातावरण बदलले आहे. खेळाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. खेळाडूंना काही कमी पडणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, आता चमकदार कामगिरी करण्याची वेळ तुमची असल्याचे सांगत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना साद घातली.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचे भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात शानदार सोहळय़ात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी राज्याच्या  क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया, केंद्रीय क्रीडा व युवक खात्याचे राज्यमंत्री नितीश प्रमाणिक हे उपस्थित होते.

खेळाडूंना मार्गदर्शन करतानाच ठाकूर यांनी गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. गेल्या वर्षी स्पर्धेत नोंदविण्यात आलेले सर्व १२ विक्रम हे मुलींनी नोंदवले होते. आता मुलींनी मागे वळून न बघता पुढे जायला हवे आणि मुलांनी आपली कामगिरी विक्रमापर्यंत उंचवावी, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील क्रीडाप्रेमी आहेत. देशातील खेळाडूंशी ते सातत्याने संपर्क साधत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही भारत भरारी घेत आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या पाच वर्षांत केंद्र शासनाने अतिशय मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. भविष्यात भारताला क्रीडा ताकद करणे आता तुमच्या हातात आहे, असे सांगून ठाकूर यांनी खेळाडूंना प्रेरित केले.

उद्घाटन सोहळय़ात अविनाश साबळे व निखहत झरीन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

खो-खो : महाराष्ट्राची विजयी सलामी

पहिल्या स्पर्धेपासून खो-खो खेळात मक्तेदारी राखलेल्या महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी अपेक्षित विजयी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या मुलींनी पहिल्या सामन्यात तमिळनाडूचा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. मुलांच्या विभागातही महाराष्ट्राने तेलंगणाला डावाने पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 01:31 IST
Next Story
Harmanpreet Kaur: अंडर-१९ वर्ल्डकप जिंकताच महिला खेळाडूंना वाढला दबदबा, हरमनप्रीत कौर आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रँडची होणार ब्रँड अ‍ॅम्बेसेडर