Kieron Pollard Breaks Big Record Of Jos Buttler: वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज कायरन पोलार्ड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आधी ख्रिस गेलच्या नावावर होता. पण पोलार्डने हा रेकॉर्ड मोडून काढत नंबर १ स्थानी कब्जा केला होता. त्यानंतर जोस बटलरने हा रेकॉर्ड मोडून काढला आणि अव्वल स्थानी कब्जा केला होता. आता पोलार्डने बटलरला मागे टाकून सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये पुन्हा एकदा नंबर १ स्थान गाठलं आहे.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत बटलरने मँचेस्टर सुपर जायंट्स संघाचं प्रतिनिधित्व करताना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पण पोलार्डने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सेंट लुसिया किंग्स संघाकडून खेळताना ३५ धावा करताच बटलरचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ६५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. पोलार्डच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ७४९ सामन्यातील ६६६ डावांत १४९२१ धावा करण्याची नोंद आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये धावांचं फार जास्त अंतर नाही. त्यामुळे दोघांमध्ये रस्सीखेच सुरूच राहणार आहे. पण बटलर पोलार्डला मागे टाकून पुढे जाऊ शकतो. कारण, पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि तो काही मोजक्याच स्पर्धा खेळतो. तर बटलर अजूनही इंग्लंडकडून टी-२० क्रिकेट खेळतो. यासह जगभरातील टी-२० लीग स्पर्धाही खेळतो.

आता पोलार्डकडे एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमध्ये १५००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच क्रिकेटपटू बनू शकतो. पोलार्डचा पुढील सामना येत्या शुक्रवारी होणार आहे. या सामन्यात जर त्याने ७९ धावांची खेळी केली, तर तो टी-२० क्रिकेटमध्ये १५००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनू शकतो.

तर दुसरीकडे बटलर देखील पोलार्डला मागे टाकून पु्न्हा नंबर १ स्थानी कब्जा करु शकतो. बटलरने २००९ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केलं होतं. त्याला आतापर्यंत एकूण ५२२ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १४८३३ धावा केल्या आहेत. बटलरला १५००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी अजूनही १६७ धावांची गरज आहे. बटलरने आपल्या टी-२० कारकिर्दीदरम्यान ९ शतकं आणि १०६ अर्धशतकं झळकावले आहेत. बटलरने काही दिवसांपूर्वीच पोलार्डचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.