Kieron Pollard on Hardik Pandya Captaincy: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा आणखी एक निराशाजनक हंगाम संपल्यानंतर पोलार्डने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने गेल्या तीन हंगामांपैकी दुसऱ्यांदा गुणतालिकेत तळाशी स्थान मिळवलं. यंदा संघ नवव्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे, तीनही हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सकडे स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक संघ पाहिलं जात असतानाही अपेक्षित यश मिळालं नाही.

२०२४ मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिकला चाहत्यांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागला होता. २०२५ मध्ये परिस्थिती काहीशी सुधारल्यासारखी वाटली, पण २०२६ हंगाम पुन्हा अपयशी ठरला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली अनुभवी खेळाडूंनी सजलेला मुंबई इंडियन्सचा संघ चांगलाच अपयशी ठरताना दिसला.

“काही गोष्टींवर मी नक्कीच प्रश्न उपस्थित करेन-” पोलार्ड

भारताच्या २०२६ टी-२० विश्वचषक विजयानंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या अनुभवी भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, संपूर्ण स्पर्धेत संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. संपूर्ण हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वशैलीवर आणि त्याच्या निर्णयांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीसाठी अनेकांनी थेट हार्दिकच्या नेतृत्त्वालाच जबाबदार धरलं. हंगामातील शेवटच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कायरन पोलार्डने मान्य केलं की, हा हंगाम ना व्यवस्थापनाच्या अपेक्षेनुसार गेला ना हार्दिकच्या.

“नेतृत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर हार्दिकला जसं हवं होतं तसं काही घडलं नाही. व्यवस्थापनालाही अपेक्षित यश मिळालं नाही. पण एक गोष्ट नक्की, आम्ही फ्रँचायझीला यश मिळवून देण्यासाठी शक्यतोपरी सर्व प्रयत्न केले.” असं पोलार्ड म्हणाला. “आता इथे बसून कोणावर दोषारोप करणं योग्य नाही. संघ हरतो तेव्हा त्याकडे सामूहिक अपयश म्हणून पाहावं लागतं. काही सामने जिंकता, काही हरता,” असं पोलार्ड म्हणाला. मात्र, पोलार्डने अप्रत्यक्षपणे काही निर्णयांवर नाराजीही व्यक्त केली.

“अखेरीस काही गोष्टींवर मी नक्की प्रश्न उपस्थित करेन. हार्दिक प्रयत्न करत होता, आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, पण गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नाहीत. आता बसून चर्चा करावी लागेल आणि पुढे काय योग्य आहे ते ठरवावं लागेल. पुढे काय होईल हे कुणालाच माहित नाही. सध्या आम्हाला या जखमा भरून काढायच्या आहेत आणि पुढील १२ महिन्यांत अधिक मजबूत पुनरागमन करायचं आहे,” असंही त्याने सांगितलं.

हार्दिक पंड्याचं नेतृत्व आता पुढील आयपीएल हंगामाआधी सर्वात चर्चेचा विषय ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने सार्वजनिकरित्या आपल्या कर्णधाराला पाठिंबा दिला असला, तरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या निकालांनी अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण केले आहेत.