सूर्यास्ताच्या मावळतीच्या किरणांच्या साक्षीने चौथ्या दिवसअखेर ब्रेन्डन मॅक्क्युलम आपली बॅट उंचावत परतत होता, तेव्हा वेलिंग्टनवर सूर्यापेक्षा तेजाने तोच तळपत असल्याची प्रचीती येत होती. बेसिन रिझव्‍‌र्ह स्टेडियमवर सोमवारी आवर्जून हजेरी लावणाऱ्या क्रिकेटरसिकांचा टाळ्यांचा कडकडाट अविरत सुरू होता. रविवारी कर्णधार ब्रेन्डन जेव्हा फलंदाजीला उतरला, तेव्हा न्यूझीलंडची ३ बाद ५२ अशी केविलवाणी स्थिती होती. पण ब्रेन्डन वीराप्रमाणे लढला आणि सामन्याला कलाटणी दिली. सोमवारी दिवसअखेर त्याच्या खात्यावर २८१ धावा जमा होत्या आणि न्यूझीलंडकडे ३२५ धावांची आघाडी आहे. त्यामुळे पराभव क्षितिजापल्याड दिसेनासा झाला होता. त्यामुळेच ब्रेन्डनचे दिवसअखेर प्रत्येक भारतीय खेळाडूनेही कौतुक केले. विराट कोहली त्याचे हस्तांदोलन करायला सर्वात पुढे होता. भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनीनेही पुढे सरसावून ब्रेन्डनची पाठ थोपटली. चौथ्या दिवशी न्यूझीलंडने बी जे वॉटलिंगच्या (१२४) रूपात फक्त एकमेव फलंदाज गमावला. भारतीय गोलंदाजांना एकीकडे बळी मिळवण्यासाठी झगडावे लागले, तर दुसरीकडे मॅक्क्युलम आणि वॉटलिंग यांनी सहाव्या विकेटसाठी साकारलेल्या ३५२ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीने भारताच्या विजयाचा स्वप्नाचा चुराडा केला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ६ बाद ५७१ धावांचा डोंगर उभारला असून, मंगळवारी अखेरच्या दिवशी दुसऱ्या कसोटी सामन्याने मोठी रंगत निर्माण केली आहे.
मॅक्क्युलम हा त्रिशतकापासून फक्त १९ धावांच्या अंतरावर आहे. त्याचप्रमाणे न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीसह मालिकेवर निभ्रेळ वर्चस्व प्रस्थापित करणार की भारत सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधणार, हे सारे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु भारताने दुसरी कसोटी अनिर्णीत जरी राखली तरी भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावण्याची नामुष्की पदरी पडणार आहे.
रविवारी न्यूझीलंडची दुसऱ्या डावात ५ बाद ९४ अशी दयनीय अवस्था झाली होती. परंतु मॅक्क्युलम आणि वॉटलिंग जोडगोळीने तब्बल १२३ षटके किल्ला लढवला आणि २४६ धावांच्या पिछाडीचे समाधानकारक आघाडीत रूपांतर केले. सुमारे सहा सत्रे मैदानावर ठाण मांडणारा मॅक्क्युलम अजूनही मैदानावर आहे. त्याने ५२५ चेंडूंमध्ये २८ चौकार आणि ४ षटकारांनिशी आपली ‘किमयागार’ खेळी सादर केली. समोरच्या टोकावर असलेल्या जेम्स निशामने  ९३ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावा करताना पर्दापणात अर्धशतक साजरे केले.
भारताकडून झहीर खान, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी सोमवारी बळी मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तिसऱ्या नव्या चेंडूवरही त्यांना यश मिळाले नाही.  याशिवाय रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे कामचलाऊ गोलंदाजही निष्क्रिय ठरले. चहापानानंतर धोनीनेही आपले नशीब आजमावून पाहिले. धोनीच्या षटकात मॅक्क्युलम-वॉटलिंग जोडीने साडेतीनशेचा टप्पा गाठला आणि पुढच्याच षटकात त्यांनी सहाव्या विकेटसाठीच्या भागीदारीचा विश्वविक्रम मोडीत काढला. २००९मध्ये अहमदाबाद येथे महेला आणि प्रसन्ना जयवर्धने यांनी ३५१ धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली होती. नव्या चेंडूवरील पहिल्याच षटकात शमीने वॉटलिंगला पायचीत करून ही जोडी फोडली. ही भागीदारी करताना लागोपाठच्या कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके साकारणारा मॅक्क्युलम हा सहावा कसोटीपटू ठरला आहे. मॅक्क्युलमचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे द्विशतक. या साऱ्या मोठय़ा खेळी मॅक्क्युलमने भारताविरुद्धच साकारल्या आहेत, हे विशेष. त्यामुळे मंगळवारी उगवतीचा सूर्य उत्कंठेच्या किरणांनिशीच अवतरेल.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : १९२
भारत (पहिला डाव) : ४३८
न्यूझीलंड (दुसरा डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. झहीर १, हमिश रुदरफोर्ड झे. धोनी गो. झहीर ३७, केन विल्यमसन झे. धोनी गो. झहीर ७, टॉम लॅथम झे. धोनी गो. शमी २९, ब्रेन्डन मॅक्क्युलम खेळत आहे २८१, कोरे अँडरसन झे. व गो. जडेजा २, बी. जे. वॉटलिंग पायचीत गो. शमी १२४, जिम्मी निशाम खेळत आहे ६७, अवांतर (बाइज ५, लेग बाइज ११, वाइड २, नो बॉल ७) २५, एकूण १८९ षटकांत ६ बाद ५७१.
बाद क्रम : १-१, २-२७, ३-५२, ४-८७, ५-९४, ६-४४६
गोलंदाजी : इशांत शर्मा ३९-४-१२४-०, झहीर खान ४३-१२-१२९-३, मोहम्मद शमी ४०-५-१३६-२, रवींद्र जडेजा ४९-१०-१०८-१, रोहित शर्मा ११-०-४०-०, महेंद्रसिंग धोनी १-०-५-०.

सोमवारच्या दिवसाचा खेळ आमच्यासाठी अभिमानास्पद असा आहे. ब्रेन्डनने सुरेख खेळी साकारली. दोन दिवसांपूर्वीच्या परिस्थितीतून आघाडी मिळवण्याची स्थिती निर्माण करणे खूपच समाधानकारक आहे. प्रत्येत चेंडूला त्याच्या गुणवत्तेनुसार खेळण्याचे धोरण आम्ही आखले होते. भारतीय गोलंदाजांनी आमच्यावर दडपण ठेवले, परंतु आम्ही संघर्ष करत चिवट लढत दिली. संपूर्ण चौथ्या दिवसात केवळ एक फलंदाज गमावणे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
-बी जे वॉटलिंग

न्यूझीलंडच्या संघाने अफलातून खेळ करत सामन्याचे चित्र पालटले. मात्र अजूनही या कसोटीचा एक दिवस बाकी आहे. कसोटी जिंकण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. परंतु पराभूत झालो तरी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. कामगिरीबाबत निराश नक्कीच आहोत, पण आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. पहिल्या डावात न्यूझीलंडला आम्ही दोनशेच्या आत गुंडाळले. मग कठीण परिस्थितीत आम्ही चांगली फलंदाजी केली, मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या डावात जबरदस्त खेळ केला.
-शिखर धवन