कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफच्या उंबरठ्यावर असलेल्या गुजरात टायटन्सचा २९ धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह केकेआरने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. केकेआर संघाने पुढील दोन्ही सामने जिंकल्यास संघ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

केकेआरला अखेरच्या दोन चेंडूत म्हणजेच १२ चेंडूत ४५ धावांची गरज होती. साई सुदर्शन व जोस बटलरची जोडी मैदानावर होती. सौरभ दुबेला १८वं षटक खेळण्याची संधी मिळाली, त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले, तिसरा चेंडू वाईड होता. तिसऱ्या लीगल चेंडूवर २ धावा तर चौथ्या चेंडूवर १ धाव घेतली. तर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जोस बटलर झेलबाद झाला. त्यानंतर राहुल तेवतिया फलंदाजीला आला, अखेरच्या चेंडूवर एक धाव घेतली. सौरभ दुबेने उत्कृष्ट १९वं षटक टाकल्याने केकेआरने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

केकेआरने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या कोपराला चेंडू लागल्याने तो वेदनेने विव्हळताना दिसला. चेंडूचा फटका इतका जबरदस्त होता की साई २४ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. यानंतर आलेला निशांत सिंधू १ धाव करत बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल व जोस बटलरने ७३ चेंडूत १२८ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. शुबमन गिलने ४९ चेंडूत ५ चौकार व ७ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने अर्धशतकी खेळी केली.

गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी पाचारण केलं. केकेआरच्या टॉप-४ फलंदाजांनी २४७ धावांचा डोंगर उभारला. अजिंक्य रहाणे १४ चेंडूत १४ धावा करत बाद झाला. यानंतर फिन एलनने ३५ चेंडूत ४ चौकार व १० षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. फिन एलन व अंगक्रिश रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली. अंगक्रिश रघुवंशीने ४४ चेंडूच ४ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली. कॅमेरून ग्रीन व रघुवंशीने ५२ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. तर ग्रीनने २८ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली. गुजरातकडून फक्त मोहम्मद सिराज व साई किशोर या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.