LSG vs KKR Super Over IPL 2026 Match Highlights: लखनौ सुपर जायंट्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. संघाने सुपर ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर लखनौला विजयासाठी ७ धावांची गरज असताना मोहम्मद शमीने षटकार खेचला आणि सामना बरोबरीत आणला. यासह सुपर ओव्हर खेळवण्यात आली. केकेआरच्या या सामन्याचे हिरो ठरले रिंकू सिंह व सुनील नरेन. रिंकू सिंहने या सामन्यात ८१ धावांची खेळी करत फिल्डिंग करताना ६ झेल टिपले. तर सुनील नरेनने न भूतो न भविष्यती अशी गोलंदाजी केली. त्याने सुपर ओव्हरमध्ये पहिल्या ३ चेंडूत विकेट्स घेत संघाला फक्त २ धावांचं विजयासाठी आव्हान दिलं.
KKR vs LSG सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
सुपर ओव्हरसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून एडन मारक्रम व निकोलस पुरनची जोडी मैदानात आली. तर केकेआरकडून सुनील नरेन गोलंदाजीसाठी आला. पुरनला नरेनने पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला. त्याने एक धाव घेतली. त्यानंतर मारक्रम तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आला आणि तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रिंकू सिंह व रोव्हमन पॉवेल यांनी रिले कॅच पकडत दुसरी विकेट घेतली. यासह दोन विकेट्स गमावल्याने केकेआरला विजयासाठी २ धावांची गरज आहे.
केकेआरकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी रिंकू सिंह व रोव्हमन पॉवेल ही जोडी मैदानावर उतरली. तर लखनौकडून गोलंदाजीसाठी प्रिन्स यादव आला. केकेआरला विजयासाठी २ धावांची गरज होती. प्रिन्स यादवच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार लगावत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
लखनौला अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना काय घडलं?
लखनौला अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती. कार्तिक त्यागीकडे गोलंदाजीची संधी दिली. त्याने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. तर दुसरा चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू देखील कार्तिक त्यागीने नो बॉल टाकला. त्यानंतर लीगल दुसऱ्या चेंडूवर हिम्मत सिंगने एक चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर हिम्मत सिंग झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव तर पाचवा चेंडू निर्धाव राहिला. यानंतर शमीने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत सामना बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा मोर्चा सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला.
केकेआरने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. मिचेल मार्श २ धावांवर बाद झाला. यानंतर एडन मारक्रम व ऋषभ पंत यांनी अर्धशतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला. मारक्रम ३१ धावा करत बाद झाला. यानंतर ऋषभ पंत ४२ धावांची खेळी करत माघारी परतला. निकोलस पुरन ९ धावांवर बाद झाल्याने त्याचा खराब फॉर्म पुन्हा दिसून आला. जॉर्ज लिंडे २ चौकार मारून ८ धावा करत बाद झाला. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती व वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अनुकूल रॉय, कॅमरून ग्रीन व सुनील नरेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
लखनौने नाणेफेक जिंकत केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. केकेआरची सुरूवात पुन्हा एकदा खूप खराब झाली. टीम सेफर्ट शून्यावर तर अजिंक्य रहाणे १० धावांवर बाद झाला. यानंतर अंगक्रिश रघुवंशीला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डमुळे बाद देण्यात आलं. यानंतर कॅमेरून ग्रीनने ५१ चेंडूत ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. तर रिंकूने धमाकेदार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. रिंकूने ५१ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली. रिंकूने अखेरच्या षटकात सलग ४ षटकार खेचत केकेआरला २० षटकांत ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवलं.
लखनौकडून मोहसीन खानने भेदक गोलंदाजी करत ४ षटकांत २३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह यंदाच्या आयपीएलमध्ये फायफर घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तर जॉर्ज लिंडेने १ विकेट घेतली.
