KKR vs MI Highlights In Marathi: कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सने सहज पराभव केला. मुंबईविरूद्धच्या या विजयानंतर केकेआरचे प्लेऑफ गाठण्याची शक्यता अधिक वाढली आहे. कोलकाताचा संघ आता पंजाब किंग्सच्या बरोबरीत आला असून दोन्ही संघांचे ६-६ गुण आहेत. याशिवाय केकेआरचा रन रेटदेखील आता प्लसमध्ये आला आहे. त्यामुळे केकेआरला स्पर्धेतील अखेरचा सामना जिंकत प्लेऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे.
अंगक्रिश रघुवंशीच्या जागी कन्कशन सबस्टिट्यूट तेजस्वी दहिया या अनकॅप्ड खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली. तेजस्वी दहियाला विकेटकिपिंगनंतर फलंदाजीची संधी मिळाली. संघाला ३० चेंडूत ३० धावांची गरज असताना तो फलंदाजीला आला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याच्या ग्लोव्हजची कड घेत चेंडू चौकारासाठी गेला.
मुंबईने दिलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने फिन एलनला क्लीन बोल्ड करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. अंगक्रिश रघुवंशीला दुखापत झाल्याने तो पहिल्या डावात मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे मनिष पांडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे २१ धावा करत बाद झाला. तर कॅमेरून ग्रीन ४ धावांवर माघारी परतला.
ग्रीननंतर आलेल्या रोव्हमन पॉवेलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले. मुंबईने तयार केलेला सर्व दबाव पॉवेलने आपल्या एकापेक्षा एक चौकारांनी कमी केला. ज्याला मनिष पांडेने चांगली साथ दिली. पॉवेलला झेलबाद करण्याची मोठी संधी होती. पण दीपच चहर व रॉबिन मिंज यांनी एकमेकांकडे पाहत हा झेल सोडून दिला. ज्याचा मुंबईला चांगलाच फटका बसला. मनिष पांडे ६ चौकारांसह ४५ धावांची खेळी करत बुमराहच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. गझनफरने यानंतर रोव्हमन पॉवेलला ४० धावांवर झेलबाद केलं. अखेरीस रिंकू सिंहने चौकार मारत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईकडून कार्बिन बॉशने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर, जसप्रीत बुमराह व गझनफर यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण मुंबईची सुरूवात फार खराब झाली. कॅमेरून ग्रीनने सामन्याच्या दुसऱ्या षटकात रिकल्टनला ६ धावांवर तर नमन धीरला शून्यावर बाद करत मुंबईला दुहेरी धक्का दिला. यानंतर रोहित शर्मा १५ धावा तर सूर्यकुमार यादवही १५ धावा करत शुभम दुबेच्या गोलंदाजीवर बाद झाले. मुंबईची अवस्था ५७ धावांवर ४ विकेट्स अशी होती. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरला नाही. तिलक वर्मा व हार्दिक पंड्या यांनी २० आणि २६ धावांचं योगदान दिलं. तर विल जॅक्स १४ धावा करत धावबाद झाला.
यानंतर कार्बिन बॉशने मुंबईला १४७ धावांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. कार्बिन बॉशने १८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. दीपक चहरने ७ चेंडूत १० धावा करत मुंबईने २० षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या. केकेआरकडून सौरभ दुबे, कॅमेरून ग्रीन व कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेनने १ विकेट घेतली.
