KKR beat SRH by 8 wickets: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ विकेट्सने पराभव करत विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. या विजयासह केकेआरने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सर्वात खराब सुरूवातीनंतर आता केकेआरची गाडी रूळावर येताना दिसत आहे. केकेआरच्या गेल्या तिन्ही सामन्यांमधील विजयात रिंकू सिंहने महत्त्वाची भूमिका बजावत विजयी धावा केल्या आहेत. या सामन्यातही १९व्या षटकात सलग दोन चौकार लगावत रिंकूने संघाला शानदार विजय मिळवून दिला.

केकेआरच्या या विजयाचा मुंबई इंडियन्सला चांगलाच धक्का बसला आहे. आता गुणतालिकेत केकेआरचा संघ मुंबईपेक्षा गुणांनी पुढे गेला असून त्यांनी जर सातत्याने सामने जिंकले तर मुंबईच्या प्लेऑफच्या आशांना धक्का बसू शकतो.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने चांगली सुरूवात केली. अजिंक्य रहाणे व फिन एलनची जोडी सलामीला उतरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. यानंतर कमिन्सच्या षटकात त्याची चौकार-षटकारांसह धुलाई केल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फिन एलन १३ चेंडूत २९ धावा करत झेलबाद झाला. एलनच्या विकेटनंतर अजिंक्य राहणे व अंगक्रिश रघुवंशी यांनी ६६ चेंडूत ८४ धावांची मॅचविनिंग भागीदारी रचली.

अंगक्रिश रघुवंशी ४७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांची खेळी करत बाद झाला. तर अजिंक्य रहाणे ४३ धावांवर बाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. रघुवंशी बाद झाल्यानंतर आलेला रिंकू सिंह संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. रिंकू सिंहने ११ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह २२ धावा केल्या. यासह केकेआरने १८.२ षटकांत ३ बाद १६९ धावा करत महत्त्वपूर्ण २ गुण मिळवले.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने इशानच्या मदतीने संघाचा डाव सावरला. हेड २८ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावा करत बाद झाला. तर इशान किशन २९ चेंडूत ४२ धावा करत माघारी परतला. हेनरिक क्लासेनला बाद करण्यासाठी रोव्हमन पॉवेलने हवेत झेप घेत कमालीचा चेंडू टिपला.

क्लासेनच्या विकेटनंतर हैदराबादच्या सर्व फलंदाजांनी एकामागून एक विकेट्स गमावले. ११७ धावांवर ३ विकेट्स अशी स्थिती असताना हैदराबादचा संघ १९ षटकांत सर्वबाद झाला आणि फक्त १६५ धावा करू शकला. केकेआरकडून वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेन, कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर वैभव अरोरा, कॅमेरून ग्रीन व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.