Ajinkya Rahane Fined By BCCI: आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे आहे. पण रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर काही खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकत नाही. कोलकाताचा संघ अनेकदा विजयाच्या जवळ पोहोचला. पण शेवटी पराभव झाला. १४ एप्रिलला झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला दुहेरी धक्का बसला आहे. सामना गमावल्यानंतर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाज निर्धारित वेळेत २० षटकं टाकू शकलेले नाहीत. याचा फटका त्यांना सामना सुरु असतानाही बसला. शेवटच्या षटकात त्यांना ३० यार्ड सर्कलच्या बाहेर एक खेळाडू कमी ठेवावा लागला. यासह स्लो ओव्हर रेटमुळे अजिंक्य रहाणेवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीझमध्ये अजिंक्य रहाणेने तोडलेल्या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने ठरलेल्या वेळात २० षटकं टाकली नाहीत. हे आयपीएलच्या अनुच्छेद २.२ चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्याच्यावर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही त्याची पहिली चूक आहे. ही त्याची पहिली चूक असल्याने केवळ १२ लाख दंड आकारण्यात आला आहे. पण यापुढे अशी चूक झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट होऊ शकते. तर तिसऱ्यांदा चूक झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट होऊन एका सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.

चेन्नईचा विजय

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकात ५ गडी बाद १९२ धावा केल्या. यादरम्यान संजू सॅमसनने ४८, डेवाल्ड ब्रेव्हिसने ४१ आणि आयुष म्हात्रेने ३८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रमनदीप सिंगने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर रोमन पॉवेलने नाबाद ३१ आणि अजिंक्य रहाणेने २८ धावा केल्या. पण कोलकाताचा संघ विजयापासून ३२ धावा दूर राहिला.