रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामात कोणत्या संघाकडून खेळणार? मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करणार का? या प्रश्नांचं उत्तर खुद्द रोहित शर्मानेच दिलं आहे. सोनी वाहिनीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या रोहित शर्माच्या कार्यक्रमाचा ट्रेलर समोर आला आहे. त्यामध्ये रोहितचा जिवलग मित्र आणि केकेआरचा प्रशिक्षक अभिषेक शर्मा यांच्यातला संवाद पाहायला मिळाला आहे.
‘रोहितने आज पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. हा रंग आयपीएलमध्ये कोणत्या संघाचा आहे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण रोहितला पिवळा आणि सोनेरी रंग अर्थात केकेआरची जर्सी शोभून दिसेल’, असा टोला त्याचा जिवलग मित्र आणि माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर यांनी लगावला.
यानंतर प्रेक्षकांनी मुंबई मुंबई अशा घोषणा दिल्या. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणाही ऐकू आल्या. रोहितने घोषणा थांबल्यावर एका शब्दात उत्तर दिलं- फॉरएव्हर. मी मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार यावर रोहितने शिक्कामोर्तब केलं.
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदं नावावर केली. स्पर्धेतल्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. रोहितचे नेतृत्वगुण खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून समोर आलं.
मात्र काही हंगामांपूर्वी मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने रोहितच्या जागी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. हार्दिकला कर्णधार म्हणून तसंच मुंबई इंडियन्स संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितला कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे हार्दिकची हुर्योही उडवण्यात आली. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत रसातळाला राहत असल्याने संघात बदल होतील असे संकेत मिळत आहेत. रोहित संघात असणार ना यावरून चाहत्यांच्या मनात साशंकता आहे. मात्र मनोरंजनात्मक कार्यक्रमात रोहितने सदैव मुंबईकडूनच खेळत राहणार असल्याचं सांगितलं.
