मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासंदर्भात ट्रेड ऑफच्या वार्ता पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. चेन्नईनंतर कोलकाता नाईट रायडर्सचं नाव हार्दिकच्या ट्रेडऑफबाबत चर्चेत आहे. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणेने कोलकाताचं नेतृत्व केलं होतं. अजिंक्यने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने कोलकाताला सक्षम कर्णधाराची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून हार्दिकने आयपीएल पदार्पण केलं होतं. वादळी खेळी, कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज, अफलातून क्षेत्ररक्षक आणि सक्षम कर्णधार यामुळे हार्दिक संघात असणं अत्यंत फायदेशीर असतं. मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदांमध्ये हार्दिकचा मोलाचा वाटा आहे. मात्र २०२३ मध्ये हार्दिकने मुंबईला रामराम करत गुजरात टायटन्स या नव्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने जेतेपदावर नाव कोरण्याची किमया केली. दुसऱ्या वर्षीही गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. यानंतर हार्दिकने मुंबई इंडियन्सकडे परतण्याचा निर्णय घेतला. हार्दिकच्या ट्रेडऑफची प्रचंड चर्चा झाली होती.
हार्दिक परतल्यानंतर मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. २०२४ टी२० वर्ल्डकपविजेता कर्णधार आणि मुंबईचा राजा हिटमॅन रोहित शर्माला बाजूला केल्यामुळे हार्दिकला प्रचंड रोषाला सामोरं जावे लागले. हार्दिकला मुंबई इंडियन्सबरोबरच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये वैयक्तिक खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईला प्लेऑफसाठीही पात्र ठरता न आल्याने संघव्यवस्थापनाने कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली.
रोहित शर्मा कर्णधारपदी परतण्याची शक्यता असल्याने हार्दिकच्या ट्रेडऑफची चर्चा पुन्हा तीव्र झाली. सुरुवातीला हार्दिक चेन्नई सुपर किंग्सकडे जाणार अशी चर्चा होती. हार्दिक धोनीचा अतिशय जिवलग मित्र आहे. हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू चेन्नई संघाची ताकद वाढवू शकतो. मात्र काही काळानंतर या चर्चा विरल्या. आता केकेआर रिंगणात उतरलं आहे. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात केकेआर व्यवस्थापन हार्दिकसाठी उत्सुक नव्हतं. खेळाडू म्हणून हार्दिकने कर्तृ्व सिद्ध केलं असलं तरी त्याच्या फिटनेसंदर्भात चिंता आहे. दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकल्याने हार्दिक प्रदीर्घ काळ भारतीय संघासाठीही खेळू शकलेला नाही. आयपीएल हंगाम संपल्यानंतर हार्दिक एकही सामना खेळू शकलेला नाही.
रिटेन्शनसाठी १५ नोव्हेंबर ही डेडलाईन आहे तर १६ डिसेंबर रोजी गोव्यात लिलाव होणार आहे. ट्रेडिंग विंडो लिलावाच्या आधी आठवडाभर बंद होईल. लिलावानंतर एका आठवड्यानंतर पुन्हा खुली होईल आणि पुढचा हंगाम सुरू होण्याच्या महिनाभर आधी पुन्हा बंद होईल.
हार्दिकबरोबर कायम असणाऱ्या लवाजम्यामुळे केकेआर त्याला ताफ्यात घेण्यासाठी सुरुवातीला उत्सुक नव्हतं. मात्र आता नव्याने चर्चेला सुरुवात झाल्याचं वृत्त टेलिग्राफने दिलं आहे. हार्दिकला ताफ्यात घ्यायचं तर कोलकाताला किमान दोन खेळाडूंना रिलीज करावं लागेल. केकेआरचं हुकूमी अस्त्र सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती आणि धडाकेबाज फिनिशर रिंकू सिंह यांना रिलीज करण्यास तयार नाही. या तिघांबाबत कोणताही चर्चा होणार नाही असं केकेआरने स्पष्ट केलं.
कॅमेरुन ग्रीन दुखापती आणि ऑस्ट्रेलियाचं वेळापत्रक लक्षात घेता किती खेळेल याबाबत साशंकता असल्याने ट्रेडऑफ चर्चेत त्याचं नाव नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिकच्या बदल्यात हर्षित राणा आणि अंगक्रिश रघवुंशी यांच्यासाठी प्रयत्नशील आहे. केकेआरला जिंकून देण्यात हर्षितचा मोठा वाटा होता. विकेटकीपर बॅट्समन अंगक्रिशने दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. मुंबईला भारतीय विकेटकीपर बॅट्समनची आवश्यकता आहे. अंगक्रिश उत्तम पर्याय ठरू शकतो. याव्यतिरिक्त तो मुंबईकर असल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव कामी येऊ शकतो. अंगक्रिशच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी खेळाडू अभिषेक नायर हेच केकेआरचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. त्यामुळे लाडक्या शिष्याला रिलीज करण्यास ते तयार होण्याची शक्यता कमी आहे.
चर्चेसंदर्भात दोन्ही संघव्यवस्थापनांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. ट्रेडऑफसंदर्भात वाटाघाटी सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सशीही चर्चा सुरू असल्याचं समजतं. हार्दिकच्या बदल्यात यशस्वी जैस्वाल आणि रवी बिश्नोई या दोघांना ताफ्यात आणण्याचा मुंबईचा प्रयत्न होता. यशस्वीने तिन्ही प्रकारात भारताला सिद्ध केलं आहे. मुंबईला एका चांगल्या फिरकीपटूची आवश्यकता आहे. हे दोघेही निकषात चोख बसतात.
