IPL 2026 KKR vs PBKS Match Called off: आयपीएल २०२६ मधील १२ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हा सामना खेळवला जाणार होता. ३.४ षटकं झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला होता आणि त्यानंतर कट ऑफ टाईमपूर्वी काही मिनिटं आधी सामना रद्द झाल्याची पंचांनी घोषणा केली. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कोलकाताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले होते.

कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी कोलकाताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले होते. सुनील नरेन व वरूण चक्रवर्ती दोघेही पंजाबविरूद्धचा सामना खेळणार नव्हते. सुनील नरेन आजारी होता, तर वरूण चक्रवर्तीला दुखापत झाली होती. पण ३.४ षटकांचा सामनाच होऊ शकला. त्यानंतर सामना पुढे नेण्याची संधी पावसाने दिलीच नाही. बऱ्याच वेळानंतर पावसाने बॅटिंग केल्यानंतर विश्रांती घेतली. पण अखेरीस आऊटफिल्ड ओली असल्याने सामना रद्द करण्यात आला.

कोलकातामध्ये सामन्यादरम्यान पावसाची चिन्ह असल्याचं हवामान विभागाने आधीच वर्तवलं होतं. दिवसभर कोलकातामध्ये पावसाने हजेरी लावली होती. नाणेफेकीवेळेस देखील मैदानावर कव्हर्स होते. पावसाने विश्रांती घेतल्याने वेळेत नाणेफेक होत सामन्यालादेखील सुरूवात झाली. पण चौथ्या षटकात पावसाने पुन्हा हजेरी लावली. रात्री १०.३० पर्यंत पावसाची बॅटिंग सुरूच होती. बराच वेळ पाऊस पडल्यामुळे आऊटफिल्ड ओली होती. आऊटफिल्ड खेळण्याजोगी करण्यासाठी खूप वेळ लागणार असल्याने ५ षटकांच्या कट ऑफ टाईमपूर्वी सामना रद्द झाल्याची माहिती पंचांनी दोन्ही कर्णधारांना दिली.

कोलकाता नाईट रायडर्ससाठी यंदाच्या हंगामाची सुरूवात फार वाईट झाली. केकेआरला सुरूवातीच्या दोन्हा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तर पंजाब किंग्सविरूद्ध दुसऱ्या सामन्याची देखील खराब सुरूवात झाली होती. संघाने झेवियर बार्टलेटच्या एका षटकात फिन एलन व कॅमेरून ग्रीन यांच्या दोन विकेट्स गमावल्या होत्या आणि ३.४ षटकांत २ बाद २५ धावा अशी संघाची स्थिती होती. त्यामुळे ५ षटकांचा सामना झाल्यानंतरही केकेआरची स्थिती फार बिकट असणार होती. त्यामुळे खराब सुरूवातीनंतर आता केकेआरला पावसामुळे गुणांचं खातं उघडण्याची संधी मिळाली आहे. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला आहे.

पंजाब-केकेआर सामन्यानंतर कशी आहे गुणतालिका? IPL 2026 Points Table after PBKS vs KKR Match

पंजाब केकेआर सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. सर्वाधिक ५ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ अनुक्रमे ४ गुणांसह दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. तर केकेआर संघाने १ गुण मिळवत ८वं स्थान गाठलं आहे.