IPL 2026 Prabhsimran Singh Xavier Bratlett Video: कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये हा सामना होत असून ३.४ षटकं झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पण यापूर्वी मैदानात प्रभसिमरन सिंगने आपल्याच संघातील खेळाडूच्या पाठीवर बॉल मारला. झेवियर बार्टलेटने चौथ्या षटकात दोन विकेट्स घेतल्या यादरम्यान ही घटना घडली.

कोलकाता नाईट रायडर्सने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पंजाब किंग्सचा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. केकेआरच्या फलंदाजीला पुन्हा एकदा खराब सुरूवात झाली. झेवियर बार्टलेटच्या चौथ्या षटकातच फिन एलन व कॅमेरून ग्रीन झेलबाद झाले. कॅमेरून ग्रीन सलग तिसऱ्या सामन्यात फेल ठरल्याने चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

प्रभसिमरन आणि बार्टलेट यांच्यातील ही घटना चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर घडली. फिन ॲलनने झेवियर बार्टलेटचा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागून उजव्या बाजूला पडला. चेंडूच्या दिशेने एकाच वेळी यष्टीरक्षक प्रभसिमरन व बार्टलेट धावत गेले. दोन्ही खेळाडू चेंडू पकडण्यासाठी धावले, पण प्रभसिमरन आधी पोहोचला आणि त्याने लगेच चेंडू उचलून स्टंपच्या दिशेने फेकला.

प्रभसिमरनचा थ्रो अगदी चुकीचा लागला आणि चेंडू जाऊन झेवियर बार्टलेटच्या पाठीवर आदळला. सुदैवाने, बार्टलेटला कोणतीही इजा झाली नाही, पण जोरात चेंडू बसला असता तर नक्कीच त्याला दुखापत झाली असती. जेव्हा प्रभसिमरनने फेकलेला चेंडू बार्टलेटच्या पाठीला लागल्याचा राग त्याने विकेट्च्या रूपात काढला.

झेवियर बार्टलेटने चौथ्या चेंडूवर फिन ॲलनला बाद केलं. ॲलन बार्टलेटच्या आउटस्विंगचा अंदाज लावण्यात चुकला आणि चेंडू बॅटची कड घेत थेट यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंगच्या ग्लोव्हजमध्ये गेला. मग, सहाव्या चेंडूवर त्याने २५ कोटींना खरेदी केलेला केकेआरचा खेळाडू कॅमेरून ग्रीनची विकेट घेतली. बार्टलेटने कॅमेरून ग्रीनला प्रभसिमरन सिंगकरवी झेलबाद केलं. अशाप्रकारे, कोलकाताने अवघ्या दोन षटकांत १६ धावांत दोन विकेट गमावल्या, मात्र कोलकातामध्ये मुसळधार पावसामुळे चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर खेळ थांबवण्यात आला.