Dhruv Jurel Stumping: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला अवघ्या १५५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १९.४ षटकात ६ गडी राखून विजयाची नोंद केली. राजस्थानने या सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. पण रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी विजय खेचून आणला. यादरम्यान ध्रुव जुरेलने केलेली स्टम्पिंग चर्चेत राहिली. कॅमेरुन ग्रीनला बाद करण्यासाठी त्याने भन्नाट वेगाने स्टम्पिंग केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या १५६ धावांचा पाठलाग करत होता. या हंगामातील रेकॉर्ड पाहता, १५६ धावांचं आव्हान फार मोठं नव्हतं. पण कोलकाताला हवी तशी सुरुवात करता आली नाही. टीम सेफर्ट आणि अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅमेरुन ग्रीनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने काही फटके मारले. पण तो देखील रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला.
कॅमेरुन ग्रीन आक्रमक फलंदाजी करत असताना राजस्थान रॉयल्सकडून रवी बिश्नोई ५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. रवी बिश्नोईने अंदाज घेत, लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. त्यामुळे ग्रीनच्या बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही. तर दुसरीकडे यष्टिरक्षण करत असलेल्या ध्रुव जुरेलने लेग साईडच्या बाहेर असलेला चेंडू पकडला आणि तोल गेला असतानाही स्टंपवर अचूक निशाण साधला. निर्णय तिसऱ्या अंपायरकडे गेला आणि तो बाद असल्याचं स्पष्ट झालं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा दमदार विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४६, यशस्वी जैस्वालने ३९ धावांची खेळी केली. तर रियान परागने १२, शिमरन हेटमायरने १५ धावा केल्या. यासह राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी बाद १५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सकडून ग्रीनने २७, रोमन पॉवेलने २३ धावा केल्या. जर शेवटी रिंकू सिंगने नाबाद ५३ आणि अनुकूल रॉयने २९ धावांची खेळी करून विजय मिळवून दिला.
