KL Rahul Hundred in DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज २५ एप्रिलच्या डबल हेडरमधील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीसाठी पंजाब किंग्सविरूद्धचा सामना निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. दिल्लीने मागील सामना गमावला होता, तर पंजाब किंग्स यंदाच्या स्पर्धेत एकही सामना न गमावता वादळी फॉर्मात खेळत आहे. पण केएल राहुल आणि नितीश राणाच्या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे.

दिल्लीकडून सलामीला उतरलेल्या केएल राहुलने उत्कृष्ट फटकेबाजी करत दणदणीत शतक झळकावलं आहे. केएल राहुलने अवघ्या ४७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीदरम्यान त्याने १२ चौकार व गगनचुंबी ५ षटकार लगावले आहेत. राहुलचे कमालीचे फटके पाहून सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. केएल राहुलने या कमालीच्या शतकासह ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

केएला राहुलने अवघ्या ४७ चेंडूत हे शतक झळकावलं आहे. आयपीएल इतिहासात दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात कमी चेंडूत जलद शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी वीरेंद्र सेहवागने ४८ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. आता सेहवागला मागे टाकत केएल राहुलने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात कमी चेंडूत शतक करणारे फलंदाज

केएल राहुल : ४७ चेंडू (विरूद्ध पंजाब किंग्स, २०२६)
वीरेंद्र सेहवाग : ४८ चेंडू (विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २०११)
एबी डिव्हिलियर्स : ५१ चेंडू (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २००९)
डेव्हिड वॉर्नर : ५२ चेंडू (विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, २०१०)
ऋषभ पंत : ५६ चेंडू (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८)

केएल राहुलने १५ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर एक शानदार चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ४७ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण करून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएलमध्ये राहुलचं हे ६वं शतक आहे. गेलच्या नावावरही आयपीएलमध्ये ६ शतकं आहेत. आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम विराट कोहलीचा नावावर असून, किंगला मागे टाकण्यासाठी राहुलला फक्त २ शतकांची गरज आहे. कोहलीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतकं (८) करण्याचा पराक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज

विराट कोहली – ८
जोस बटलर – ७
ख्रिस गेल – ६
केएल राहुल – ६
संजू सॅमसन – ५