भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलने उत्कृष्ट शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील आठवं वनडे शतक झळकावलं. ९२ चेंडूंमध्ये ११२ धावांची नाबाद खेळी करताना त्याने १२ चौकार आणि एक षटकारासह आणि १२१.७४ च्या स्ट्राईक रेटने कमालीची खेळी साकारली. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताची स्थिती ३ बाद ११५ धावा असताना राहुल फलंदाजीला उतरला. त्यानंतर काही वेळात विराट कोहली २३ धावांवर बाद झाल्याने दबाव आणखी वाढला. मात्र, राहुलने संयम आणि आक्रमकतेचा उत्तम समतोल साधत जवळपास ३० षटकं खेळपट्टीवर पाय घट्ट रोवून उभा होता आणि संघाला मजबूत स्थितीत आणलं. राहुलच्या नाबाद खेळीसह भारताने २८५ धावांचा पल्ला गाठला.
वनडे क्रिकेटमध्ये फिनिशर म्हणून केएल राहुल दिवसेंदिवस अधिक प्रभावी कामगिरी करत आहे. या शतकासह केएल राहुलने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणारा पहिला भारतीय विकेटकिपर ठरला. ही कामगिरी एमएस धोनीलाही करता आली नव्हती. याशिवाय, राजकोटमध्ये वनडे शतक करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज आहे.
२०२५ पासून राहुलने वनडेमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करताना वेगाने धावा केल्या आहेत. ४१ ते ५० षटकांदरम्यान त्याने २८३ धावा केल्या असून, या टप्प्यात त्याचा स्ट्राइक रेट १४०.०९ इतका आहे. या फेजमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे, तर स्ट्राइक रेटच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या केएल राहुलने सुरुवातीला संयम दाखवत पहिल्या सहा चेंडूंवर धाव न काढता सावधपणे खेळला. सातव्या चेंडूवर त्याने खाते उघडलं. दडपणाच्या परिस्थितीत राहुलने रवींद्र जडेजासह ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. जडेजा २७ धावांवर बाद झाला. यानंतर राहुलने नितीश कुमार रेड्डीच्या साथीने भारताचा डाव सावरत पुढे नेला. त्याच्या फलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ७ बाद २८४ असं आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं.
केएल राहुलने पहिल्या वनडे सामन्यात छोटी पण महत्त्वपू्र्ण खेली केली होती. राहुलने २१ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह २९ धावा केल्या होत्या. त्याने या महत्त्वपूर्ण खेळीसह ४९व्या षटकात भारताला सहज विजय मिळवून दिला.

