KL Rahul Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सामन्यात केएल राहुलच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्लीच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीला आलेला पथूम निसांका स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी मिळून दमदार द्विशतकी भागीदारी केली. यादरम्यान शतक झळकावताच केएल राहुलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

केएल राहुलने दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान त्याने ४६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये संजू सॅमसनची बरोबरी केली आहे. हे केएल राहुलच्या टी -२० कारकिर्दीतील ८ वे शतक आहे. तर आयपीएलमध्ये झळकावलेले ६ वे शतक आहे. यासह टी – २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आता तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. संजू सॅमसन आणि रोहित शर्मा यांच्या नावे देखील ८ शतकं झळकावण्याची नोंद आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने ९ शतकं झळकावली आहेत. तर विराट कोहलीने ९ शतकं झळकावली आहेत.

टी -२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

अभिषेक शर्मा – ९ शतकं
विराट कोहली -९ शतकं
केएल राहुल – ८ शतकं
संजू सॅमसन – ८ शतकं
रोहित शर्मा – ८ शतकं

दिल्लीने उभारला २६४ धावांचा डोंगर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. सलामीला आलेला पथूम निसांका हा अवघ्या ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणाने मिळून दिल्लीचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून २०० हून अधिक धावांची भागीदारी केली. केएल राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी केली. तर नितीश राणाने ९१ धावांची खेळी केली.