KL Rahul Record, DC vs KKR: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली हवी तशी सुरुवात करता आली नाही. केएल राहुल अवघ्या २३ धावा करून माघारी परतला. पण या छोट्या खेळीसह त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दिल्लीकडून केएल राहुल आणि पथूम निसांकाची जोडी मैदानावर आली. या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण दिल्लीला ४९ धावांवर पहिला धक्का बसला. केएल राहुल १४ चेंडूत ४ चौकार खेचून २३ धावा करुन माघारी परतला. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना १००० धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

केएल राहुलला आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ संघांकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यापैकी ३ संघांकडून खेळताना त्याने १००० धावांचा पल्ला गाठला आहे. केएल राहुलने पंजाब किंग्स संघाकडून खेळताना सर्वाधिक २५४८ धावा केल्या आहेत. तर लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना त्याने १४१० धावा केल्या आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने १००७ धावा केल्या आहेत.

दिल्लीने पहिल्या डावात केल्या १४२ धावा

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला हवी तशी सुरुवात करता आली नाही. केएल राहुल अवघ्या २३ धावा करून माघारी परतला. पथूम निसांकाने ५० धावा केल्या. दिल्लीला ४९ धावांवर पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर नितीश राणा ८ धावांवर माघारी परतला. तर समीर रिझवीने ३ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने २, कर्णधार अक्षर पटेलने ११ धावा केल्या. तर शेवटी आशुतोष शर्माने ३९ धावांची बहुमूल्य खेळी केली. दिल्लीला २० षटकांअखेर ८ गडी बाद १४२ धावा करता आल्या.