KL Rahul Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. ध्रुव जुरेल आणि रियान परागच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने १९३ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून केएल राहुलने ५६ धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
केएल राहुल हा दिल्ली कॅपिटल्स संघातील सर्वात विश्वासू फलंदाज आहे. या हंगामात दिल्लीचा संघ हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. पण केएल राहुलला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचं सोनं करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
या सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने आयपीएल २०२६ स्पर्धेत ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह केएल राहुल आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. केएल राहुलने आयपीएल स्पर्धेत ८ वेळेस ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने ९ वेल्स वेळेस हा कारनामा केला आहे. मुख्य बाब म्हणजे दोन्ही फलंदाजांनी एकाच दिवशी ५०० धावांचा पल्ला गाठला आहे.
केएल राहुलची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
२०१८- ६५९ धावा
२०१९- ५९३ धावा
२०२०- ६७० धावा
२०२१- ६२७६ धावा
२०२२- ६१६ धावा
२०२४ -५२० धावा
२०२५- ५३९ धावा
२०२६ – ५०० धावा
दिल्लीचा दमदार विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना ध्रुव जुरेलने ५३, रियान परागने ५१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने ८ गडी बाद १९३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने ५६ धावांची खेळी केली. तर अभिषेक पोरेलने ५१ धावा केल्या. दिल्लीने हा सामना शेवटच्या षटकात जिंकला.
