KL Rahul Creates History in IPL: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये केएल राहुलचं वादळ पाहायला मिळालं. सलामीला उतरलेल्या राहुलने २२६ च्या स्ट्राईक रेटने वादळी फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राहुलला दोन वेळा जीवदान दिल्याचा पंजाब किंग्सला चांगलाच फटका बसला आहे. याचा फायदा घेत राहुलने तब्बल १५२ धावांची वादळी खेळी साकारली. यासह अनोखा विक्रम करणारा राहुल पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

केएल राहुलची खेळी खूपच प्रभावी होती. तो वादळी फॉर्मात दिसत होता आणि त्याला दोनदा जीवदानही मिळालं. जेव्हा राहुल फक्त १२ धावांवर खेळत होता, तेव्हा शशांक सिंगने एक सोपा झेल सोडला. या संधीचा फायदा घेत राहुलने अवघ्या २६ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर, जेव्हा तो ५१ धावांवर खेळत होता, तेव्हा आणखी एक झेल सुटला. या दुसऱ्या जीवदानानंतर, राहुलने पूर्ण आक्रमक पवित्रा घेतला आणि अवघ्या ४७ चेंडूंमध्ये १०० धावांचा टप्पा गाठला.

राहुलने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून पंजाबच्या गोलंदाजांना हैराण केलं. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे सहावं शतक आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राहुलने संघाला एक दमदार सुरुवात करून दिली आणि २६४ धावांची विक्रमी धावसंख्या उभारण्यात मोठं योगदान देत नाबाद माघारी परतला.

केएल राहुलने ४७ चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर त्याने या सामन्यात १५२ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. राहुलने २२६.८७ च्या स्ट्राईक रेटने ६७ चेंडूत १६ चौकार व ९ षटकारांसह १५२ धावांची खेळी केली. आयपीएल इतिहासात १५० हून अधिक धावा करत सर्वात मोठी खेळी साकारणारा राहुल हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आजवर कोणत्याच भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये १५० हून अधिक धावा केलेल्या नाहीत.

आयपीएल इतिहासात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारणारे फलंदाज

ख्रिस गेल – ६६ चेंडूत १७५ धावा, २०१३
ब्रेंडन मॅक्युलम – ७३ चेंडूत १५८ धावा, २००८
केएल राहुल – ६७ चेंडूत १५२ धावा, २०२६
अभिषेक शर्मा – ५५ चेंडूत १४१ धावा, २०२५
क्विंटन डीकॉक – ७० चेंडूत १४० धावा, २०२२