KL Rahul Reaction on 20th ODI Toss Defeat Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या मालिकेत रांचीमधील पहिला वनडे सामना जिंकत भारतीय संघ १-०ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या वनडे सामन्याची नाणेफेकही भारताने गमावली आहे. कर्णधार केएल राहुल व तेंबा बावुमा नाणेफेकीसाठी मैदानावर हजर होते. राहुलने नाणं उडवलं पण निर्णय मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, यानंतर केएल राहुलने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं.
दक्षिण आफ्रिकेने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. टीम इंडियाने या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमासह केशव महाराज व लुंगी एनगिडी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतले.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्याची नाणेफेक गमावली. यासह भारताने वनडेमध्ये सलग २० नाणेफेक गमावल्या आहेत. भारताचं नाणेफेकीच्या बाजूने नशीब फारचं खराब असल्याचं दिलून येत आहे. भारतीय संघाने वनडे विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध सेमीफायनल सामन्यात वनडेमध्ये अखेरची नाणेफेक जिंकली होती. राहुलच्या नेतृत्त्वात कदाचित भारत नाणेफेक जिंकेल अशी आशा होती, पण इथेही चित्र सारखंच दिसत आहे. भारताने सलग २०वेळा वनडेमध्ये नाणेफेक गमावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
केएल राहुलने दुसऱ्या वनडे सामन्यात नाण्याला किस करत आपल्या बाजूने निर्णय लागेल ही आशा बाळगत त्याने नाणं उडवलं. बावुमाने हेड्स कॉल दिला आणि परत नाणेफेकीचा निर्णय त्याच्या बाजूने लागला. हे पाहताच केएल राहुल संतापून लगेच मागे फिरला. यादरम्यान राहुलने तेंबा बावुमाकडेही दुर्लक्ष केलं. सहसा नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात, पण नाणेफेक गमावल्याने वैतागलेला राहुल सरळ निघून बाजूला जाऊन उभा राहिला. यासह दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं.
नाणेफेकीच्या वेळी भारताच्या नाणेफेक जिंकण्याच्या अपयशाबद्दल रवी शास्त्री यांनी राहुलला विचारताच तो म्हणाला, “मला वाटतं आज सर्वात मोठा दबाव टॉसचा होता. आम्ही बऱ्याच काळापासून एकही टॉस जिंकलेला नाही, म्हणून मी खरोखरच नाणं फ्लिक करण्याचा सराव करत आहे, पण अजूनही हे काम करत नाहीये,” राहुल म्हणाला.

