KL Rahul Full Name Sunil Gavaskar Connection Profile Story: केएल राहुल हा सध्या भारतातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. आक्रमक फलंदाजीचा संयमित अंदाज, मजबूत टेक्निक आणि स्थिर डोकं यामुळे तो देशातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये गणला जातो. दीर्घकाळ सर्वोच्च स्तरावर खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे. धावा करण्याची भूक असून, देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याने सातत्याने ती दाखवून दिली आहे. केएल राहुल सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज ते अगदी फिनिशरची भूमिकाही तो पार पाडू शकतो. फलंदाजीसह राहुल उपयुक्त यष्टीरक्षकही आहे आणि नियमित यष्टीरक्षक उपलब्ध नसल्यास तो यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळतो.
केएल राहुल हा सध्या भारताच्या कसोटी संघासह श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिल्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात सलामीची भूमिका पार पाडत अर्धशतकी खेळी साकारली. अवघ्या २० धावांनी त्याचं शतक हुकलं. क्रॅम्पस येत असतानाही त्याने मैदानावर थांबत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. पण अखेरीस क्रॅम्पमुळे त्याला उभंही राहता येत नसल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. राहुल हा भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधारही आहे. पण केएल राहुलचं पूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का?
काय आहे केएल राहुलचं पूर्ण नाव?
केएल राहुलचं पूर्ण नाव कन्नूर लोकेश राहुल असं आहे. राहुलचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. राहुलचं कुटुंब शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. त्याचे वडील के. एन. लोकेश हे मंगळुरू येथील NITKमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक आहेत. त्याची आई राजेश्वरी या मंगळुरू विद्यापीठाच्या पदवी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
केएल राहुल नावामागची रंजक कहाणी
केएल राहुलच्या नावामागेही एक रंजक किस्सा आहे. राहुलचे वडील महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे आपल्या मुलाचं नाव गावसकर यांच्या मुलाच्या नावावर ठेवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांनी रोहन गावसकरचं पहिलं नाव ‘राहुल’ असल्याचा गैरसमज केला आणि त्यातून मुलाचं नाव ‘राहुल’ ठेवलं गेलं.
केएल राहुलने वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शालेय स्तरावर त्याने व्हॉलीबॉल, हॉकी आणि फुटबॉलही खेळलं; मात्र पुढे क्रिकेटलाच त्याने आपलं प्राधान्य दिलं. वयाच्या १७व्या वर्षी तो बंगळुरूला गेला आणि बँगलोर युनायटेड क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाला. रणजी संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने कर्नाटकचं १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्तरावर प्रतिनिधित्व केलं. केएल राहुलचा क्रिकेटमधील आदर्श महान फलंदाज राहुल द्रविड आहेत. राहुल द्रविडसह त्याचं अतिशय चांगलं आणि घट्ट नातं आहे.
केएल राहुलने २०१० मध्ये वयाच्या १८व्या वर्षी कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आपल्या फलंदाजीची छाप पाडली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुलने ६१ धावांची शानदार खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कर्नाटकने अनेक दर्जेदार फलंदाज घडवले आहेत. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा कर्नाटकचा एकमेव फलंदाज केएल राहुल आहे. २०१४-१५च्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने तब्बल ४४८ चेंडूंमध्ये ३३७ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.
