IND vs SL Galle Test KL Rahul Devdutt Padikkal Review Video: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीचा आज चौथा दिवस सुरू आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्यानंतर श्रीलंका संघाला २८४ धावांवर सर्वबाद केलं. यासह भारताकडे १७८ धावांची आघाडी असून सध्या मैदानावर केएल राहुल व देवदत्त पडिक्कलची जोडी आहे. यादरम्यान पडिक्कलच्या एका चालाख निर्णयामुळे राहुल बाद होता होता वाचला, यानंतर राहुलने केलेली कृती सध्या व्हायरल होत आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात कट शॉट खेळत यष्टीरक्षकाकडून झेलबाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कल व केएल राहुलची जोडी मैदानात आहे. राहुल व पडिक्कलने अर्धशतकी भागीदारी साकारली आहे. राहुल प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला, पण पडिक्कलच्या एका निर्णयामुळे राहुल वाचला.

११व्या षटकात राहुलने प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर षटकार खेचला आणि पुढचा चेंडू जयसूर्याने पायात टाकला, जो राहुलच्या पुढच्या पायाला लागला आणि पंचांनी त्याला बाद दिलं. राहुलला देखील वाटलं की तो पायचीत झाला आणि मैदानाबाहेर जात होता. तितक्यात देवदत्त पडिकक्लने त्याला मागून आवाज दिला आणि उंची दाखवत त्याला रिव्ह्यू घेण्यासाठी सांगितलं. खरंतर राहुलला वाटलं होतं की त्याच्या मागच्या पायाला चेंडू लागला आहे, शिवाय त्याचा मागचा पायदेखील फटका खेळताना वाकला होता. यामुळे राहुल मैदानाबाहेर जात होता. पण पडिक्कलने त्याला मागून हाक मारत थांबवलं आणि उंंचीची खूण करत रिव्ह्यू घेण्यासाठी त्याला सांगितलं.

राहुलने त्यानंतर लगेचच रिव्ह्यू मागितला. यानंतर तिसऱ्या पंचांनी बॉल ट्रॅकिंगमध्ये तपासल्यानंतर विकेट्स मिसिंग दिसत होतं, म्हणजेच चेंडू स्टंपला हिट होत नव्हता. यासह तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आऊट घोषित केलं, हे पाहताच राहुलने पडिक्कलला मिठी मारली आणि त्याला हेल्मेटमधूनच किस पण केलं. या दोघांच्या ब्रोमान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अखेरीस प्रभात जयसूर्यानेच केएल राहुलला बाद करत संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. १५व्या षटकात जयसूर्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना केएल राहुल झेलबाद झाला. केएलने बाद होण्यापूर्वी ४७ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलसह त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती.