KL Rahul scores 9th ODI century IND vs WI Mullanpur: केएल राहुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव सावरत शतकी खेळी साकारली. राहुलच्या या शतकी खेळीमुळे भारताने संथ सुरूवातीनंतर मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण शुबमन गिल व विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताने ५० षटकांच्या अखेरीस ३५१ धावांचा डोंगर उभारला आहे. केएल राहुलने या खेळीसह त्याची वनडेमधील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली आहे.

केएल राहुलने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत अवघ्या ८० चेंडूंत आपल्या कारकिर्दीतील नववं वनडे शतक झळकावलं. मुल्लानपूरमधील तिसऱ्या वनडे सामन्यात राहुलने भारतीय डावाला चांगला आधार दिला. एका बाजूने भारताचे फलंदाज बाद होत असताना राहुलने संयमी फलंदाजी करत डावाची धुरा सांभाळली. केएल राहुलने या सामन्यात ८७ चेंडूत १० चौकार व ६ षटकारांसह १२९ धावांची उत्कृष्ट खेळी केली.

या मालिकेत भारताच्या टॉप-३ फलंदाजांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे मालिकेतील पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळालेल्या राहुलने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. डावाची सुरुवात काहीशी डळमळीत झाल्यानंतरही राहुलने भारताला मजबूत धावसंख्येच्या दिशेने नेलं. राहुलने आपल्या शतकाची नोंद डावातील तिसरा षटकार ठोकत केली. त्याच्या या शानदार खेळीत ९ चौकारांचाही समावेश होता.

३४ वर्षीय केएल राहुलने पुन्हा एकदा भारताच्या मधल्या फळीतील प्रमुख आधारस्तंभ आणि तारणहार म्हणून आपलं स्थान मजबूत केलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत भारताने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात शुबमन गिल अवघ्या १ धावेवर, तर विराट कोहली भोपळाही न फोडता बाद झाला. यानंतर माजी कर्णधार रोहित शर्माने ऋतुराज गायकवाडच्या साथीनं भारतीय डाव सावरला. रोहितने ८५ चेंडूंत ९२ धावांची शानदार खेळी केली, तर ऋतुराजने ५७ धावा करत त्याला चांगली साथ दिली.