KL Rahul Hundred in IND vs NZ 2nd ODI: भारताचा तारणहार ठरलेल्या केएल राहुलने संघाचा डाव सावरत दणदणीत शतक झळकावलं आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत केएल राहुलने नाबाद शतकी खेळी केली. केएल राहुलचं वनडे कारकिर्दीतील हे पाचवं शतक आहे. केएल राहुल हा राजकोटच्या मैदानावर वनडेमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अगदी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला उतरत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या राहुलने संघाला दुसऱ्या वनडेत मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं आहे. केएल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक गमावत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यादरम्यान भारताची टॉप फलंदाजी फळी चांगल्या सुरूवातीनंतर झटपट बाद झाली. रोहित शर्मा-विराट कोहली-श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत आली. यानंतर संघाचा तारणहार केएल राहुलने जबाबदारी घेत संघाचा डाव सावरला.
केएल राहुलच्या शतकामुळे भारताने उभारली मोठी धावसंख्या
४ बाद ११८ अशी संघाची स्थिती असताना केएल राहुल फलंदाजीला उतरला आणि जडेजा, नितीश रेड्डी व मोहम्मद सिराजसह महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला ७ बाद २८४ धावांपर्यंत नेण्यासाठी त्याने मोठी भूमिका बजावली. केएल राहुलने दुसऱ्या वनडे सामन्यात ९२ चेंडूत १ षटकार व ११ चौकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली. राहुल ९६ धावांवर असताना त्याने गगनचुंबी षटकार खेचत ऐटीत आपलं शतक पूर्ण केलं. केएल राहुलने शतकानंतर त्याचं हेल्मेट काढलं, एका हातातली ग्लोव्हज काढले आणि लेकीसाठी खास सेलिब्रेशन केलं.
केएल राहुल व आशिया शेट्टी यांची लेक इवाराचा गेल्यावर्षी २४ मार्च २०२५ मध्ये जन्म झाला होता. लेकीच्या या सवयीप्रमाणे अॅक्शन करत केएल राहुलने तिला हे शतक डेडिकेट करत खास सेलिब्रेशन केलं.
केएल राहुलने सुरूवातीला रवींद्र जडेजाबरोबर चांगली भागीदारी रचली. मोठे फटके न खेळता केएल राहुलने सावधपणे फलंदाजी करत आपला डाव साकारला आणि मैदानावर सेट झाल्यानंतर मात्र राहुलने गियर बदलत फटकेबाजीला सुरूवात केली. राहुलने सुरूवातीला ५३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. राहुल व जडेजाने ८८ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचत मैदानावर सेट झाले. पण जडेजा सरळ फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यानंतर आलेल्या नितीश रेड्डीने राहुलबरोबर डाव साकरला. या दोघांनीही ४९ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करत २५० धावांचा टप्पा गाठला.
शतक केल्यानंतर केएल राहुलने अखेरच्या षटकात २ चौकारांसह १२ झावा करत भारताला २८० धावांचा टप्पा गाठून दिला. एका वेळेला भारत २०० धावा करेल का अशी शंका असताना तारणहार राहुलने शतक करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. केएल राहुलचं न्यूझीलंड संघाविरूद्ध दुसरं आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिसरं वनडे शतक आहे.

