KL Rahul One Hand Stunning Catch Video: भारत-इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात प्रथम गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघातील गोलंदाज गुरनूर ब्रार व जसप्रीत बुमराह यांनी कमालीची सुरूवात केली. यानंतर केएल राहुलने एका हाताने घेतलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं. वनडे संघात पुनरागमन केलेल्या शिवम दुबेच्या गोलंदाजीवर केएल राहुलने हा झेल टिपला. या झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या सामन्यातून अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचे दोन वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि हे पुनरागमन त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरलं. दुबेने गोलंदाजी करताना एक महत्त्वपूर्ण बळी मिळवून आपली छाप पाडली. यष्टिरक्षक केएल राहुलने यष्ट्यांमागे हवेत झेप घेत एका हाताने असा काही चमत्कारिक झेल टिपला की, तो पाहून पाहणारे सर्वजण पूर्णपणे थक्क झाले.
इंग्लंडच्या डावातील २२ वं षटक शिवम दुबेने टाकलं. या षटकातील चौथ्या चेंडूवर दुबेने ऑफ-स्टंपच्या अगदी जवळ एक उत्कृष्ट ‘लेंथ’चा चेंडू टाकला, जो टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज विल जॅक्सला तो चेंडू खेळावा लागला, परंतु चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्ट्यांच्या मागे वेगाने गेला; के.एल. राहुलने कोणतीही चूक न करता वायूवेगाने एक शानदार झेल टिपला.
सुरुवातीला चेंडूची दिशा ओळखून राहुल डावीकडे सरकू लागला; मात्र, चेंडू बॅटच्या कडेला लागताच त्याने उजवीकडे झेप घेत आपला उजवा हात पुढे केला आणि चेंडू थेट त्याच्या हातमोज्यामध्ये विसावला. या नेत्रदीपक एकहाती झेलमुळे खेळाडू आणि प्रेक्षक आनंदाने भारावून गेले. राहुलच्या या झेलने यजमान इंग्लंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. पण यानंतर जो रूट व लियाम डॉसनने संघाचा डाव सावरला.
केएल राहुलने घेतलेल्या या अप्रतिम झेलमुळे, शिवम दुबेला ऑगस्ट २०२४ नंतर त्याची पहिली वनडे (ODI) विकेट मिळाली. शिवम दुबेच्या वनडे कारकिर्दीतील ही केवळ दुसरीच विकेट आहे; याआधी खेळलेल्या चार वनडे सामन्यांत त्याने केवळ एकच विकेट घेतली होती.
