KL Rahul Statement on India Defeat: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ३५८ धावांचं लक्ष्य दिल्यानंतरही संघाला ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने दुसरा वनडे सामना जिंकत वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली, ऋतुराज गायकवाड व एडन मारक्रम या तिघांनीही शतकं झळकावली. मारक्रम सामनावीर ठरला. भारताने एवढी मोठी धावसंख्या केल्यानंतरही सामना गमावल्याचं खापर कोणावर फोडलं, जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघाने यासह वनडे क्रिकेटमध्ये सलग २०व्यांदा नाणेफेक गमावली होती, यापूर्वी असं कोणत्याच संघाबरोबर घडलं नव्हतं. रायपूरमध्ये बरंच दव पडल्याने सामन्यात उशिरा गोलंदाजी करणं अवघड झालं आणि त्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेने घेतला. याचबरोबर भारताने फिल्डिंग करताना काही चुका केल्या, ज्याचा फटका संघाला बसला.
केएल राहुल भारताच्य पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
केएल राहुलला सामन्यानंतर विचारण्यात आलं की हा पराभव पचवणं कठीण आहे का? यावर राहुल म्हणाला, “खरंतर नाही. दुसऱ्या डावात इतकं दव पडत असताना आणि गोलंदाजी करणं कठीण होत असतानाही चांगला प्रयत्न होता. आज पंचांनीही बॉल बदलून दिला, हेही चांगलं झालं. टॉस सामन्यात खूप महत्त्वाचा असतो आणि नाणेफेक का जिंकू शकलो नाही, याचा मी आता मलाच दोष देतोय. आम्ही काही ठिकाणी अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो.” यासह केएल राहुलने नाणेफेकीवर भारताच्या पराभवाचं खापर फोडलं.
पुढे केएल राहुल म्हणाला, “बॅटिंगबद्दल बोलायचं तर ३० अधिक धावा चांगल्याच होत्या पण तरीही आणखी २०-२५ धावा कशा करता येतील याबद्दल ड्रेसिंग रूममध्ये गेल्या सामन्यानंतर चर्चा चालू होती, जेणेकरून दव पडल्यानंतर गोलंदाजांना थोडी अधिक मदत मिळू शकेल.”
विराट-ऋतुराजच्या शतकांबद्दल कर्णधार राहुल म्हणाला, “ऋतुराजने फलंदाजी पाहणं अप्रतिम होतं. विराटला तर अशा खेळी करताना आपण ५५ वेळा… म्हणजे ५३ वेळा पाहिलंच आहे. तो नेहमीप्रमाणे आपलं काम चोख करतो. ऋतुराजने अर्धशतक केल्यानंतर ज्या प्रकारे गती वाढवली, ते कमाल होतं.”
“मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होतो, पण ऋतुराज-विराटची फलंदाजी आणि धावांची गती पाहून मी पाचव्या क्रमांकावर उतरलो. त्या दोघांची भागीदारी चांगली सुरू होती, त्यांनी गती सेट केली होती, त्यामुळे गौतम गंभीर आणि मला वाटलं की त्या वेळी मी जाणं आणि गती कायम ठेवणं योग्य ठरेल. मागच्या सामन्यात मी अर्धशतक केलं होतं, त्यामुळे कॉन्फिडन्स जास्त असलेला फलंदाज आत येणं टीमसाठी चांगलं ठरेल असंच ठरलं,” असं केएल राहुल अखेरीस म्हणाला.
