KL Rahul Toss reaction and celebration IND vs SA: भारताच्या वनडे संघाने तब्बल २ वर्षांनंतर अखेरीस नाणेफेक जिंकली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना विशाखापट्टणम खेळवला जात आहे. या वनडे सामन्यात केएल राहुलने सलग २० वेळा विश्वविक्रमी नाणेफेक गमावण्याचा सिलसिलमा मोडला आणि टॉस जिंकला. यासह भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण केएल राहुलच्या सुपरस्टिशनमुळे भारताने नाणेफेक जिंकली का? पाहूया व्हीडिओमध्ये नेमकं काय घडलं?
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील २०२३ च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंडविरूद्ध सेमीफायनलमध्ये अखेरची नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर भारताने सलग २० वनडे सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आणि या नाणेफेक गमावण्याचा परिणाम अखेरच्या सामन्यात दिसून आला. रायपूरमधील दवाने दुसऱ्या डावात महत्त्वाची भूमिका बजावल्याने भारताला ३५८ धावसंख्या उभारली असूनही पराभव पत्करावा लागला. यानंतर आता तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने अखेरीस नाणेफेक जिंकली आहे.
केएल राहुलने दुसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर नाणेफेक न जिंकल्यामुळे स्वत:ला दोष देताना दिसला होता. नाणेफेक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि मी नाणेफेक जिंकली पाहिजे होती, असं राहुल म्हणाला होता. यानुसार राहुलने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीदरम्यान एक ट्रिक वापरली. राहुलने उजव्या हाताशिवाय डाव्या हाताने नाणं हवेत उडवलं आणि नाणं खाली पडल्यानंतर अखेरीस निर्णय मात्र भारताच्या बाजूने लागलेला दिसला. हे पाहताच राहुलने हवेत पंच मारत आनंद साजरा केला आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पाहायला मिळाली. भारताने नाणेफेक जिंकताच स्टेडियममध्ये चाहत्यांनी एकच जोरदार जल्लोष केला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
क्रिकेट सामन्यादरम्यान क्रिकेटपटू विविध सुपरस्टिशन मानताना दिसतात. मैदानात येताना उजवा प्रथम पाय मैदानावर ठेवणं, फिल्डच्या पाया पडणं, सूर्याकडे पाहत मैदानात उतरणं, सेम पॅड पायासाठी वापरणं हे आणि अशा अनेक प्रकारचे सुपरस्टिशन आपण पाहिले आहेत. त्याप्रमाणेच आता राहुलने पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये नेहमीप्रमाणे उजव्या हाताने नाणं उडवलं होतं, पण संघ नाणेफेक जिंकत नसल्याने त्याने डाव्या हाताने नाणं उडवलं आणि त्यामुळे आपण नाणेफेक जिंकू असं त्याला वाटलं आणि नेमकं तसंच घडलं.
