Suresh Raina Retires: क्रिकेटपटू सुरेश रैनाने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एक खास पोस्ट लिहून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना देशाचं आणि उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करणं अभिमानास्पद होतं “माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. सुरेश रैनाचा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता पण याबाबत आधीच माहिती असल्याचे सांगत चेन्नई सुपर किंग्सच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष खुलासा केला आहे.

Asia Cup 2022: भारत श्रीलंका आज येणार आमनेसामने; दोन्ही संघाची संभाव्य ‘प्लेइंग ११’ जाणून घ्या

सुरेश रैना सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला होता. सीएसकेने विजयी होऊन ट्रॉफी उचलली त्या चारही वेळा रैना टीममध्ये खेळत होता. त्याने २००८ ते २०२१ या कालावधीत १७६ सामन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ४६८७ धावा केल्या आहेत. रैनाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मुख्य कार्यकारी अध्यक्ष कासी विश्वनाथन म्हणाले की, रैना चेन्नई सुपरकिंग्सचा ‘अविभाज्य’ भाग आहे, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात खेळताना त्याने मोठे योगदान दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो धोनीचा विश्वासू लेफ्टनंट होता.

हेही वाचा : सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”

यासोबतच विश्वनाथन यांनी सुरेश रैनाने दोन दिवसांपूर्वी आम्हाला त्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते असाही खुलासा केला. “तो यंदा आयपीएल खेळणार नाही पण त्याच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो आणि त्याला शुभेच्छा देतो”. असेही चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ विश्वनाथन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी एम. एस. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एका तासात रैनानेही निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. रैना २०११ च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वातील विजेत्या संघाचा भाग होता.