विराट कोहली म्हणजे धावांची टांकसाळ, असे एके काळी म्हटले जायचे. पण गेले काही सामने पाहता कोहलीला जास्त धावा करता आलेल्या नाहीत. पण यासाठी कोणताही अधिक सराव करत नसून एक फलंदाज म्हणून मी संघासाठी नेहमीच जबाबदारीने फलंदाजी केली आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.
फॉर्मात येण्यासाठी कोहलीने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात खेळायला पसंती दिली होती. पण या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला १६ आणि दुसऱ्या डावात ४५ धावाच करता आल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी ढासळल्यामुळे भारतीय ‘अ’ संघाला तब्बल दहा विकेट्सने हा सामना गमवावा लागला.
‘‘एक फलंदाज म्हणून मी संघासाठी नेहमीच जबाबदारीने खेळत आलो आहे. काही वेळा फलंदाजीच्या जोरावर संघाला विजयही मिळवून दिला आहे. त्यामुळे फलंदाजीमध्ये बदल करणे मला पटत नाही. निवड समितीने माझी फलंदाजी पाहूनच माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे,’’ असे कोहली म्हणाला.
श्रीलंकेतील कसोटी मालिकेविषयी कोहली म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी एक कर्णधार म्हणून ही पहिलीच मोठी संधी आहे. कारण बांगलादेशमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळवला गेला होता. त्यामुळे माझ्यासाठी ही मालिका एक आव्हान असेल. संघामध्ये युवा खेळाडू असून त्यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे, त्याचबरोबर प्रत्येकामध्ये देशासाठी चांगली कामगिरी करण्याची इच्छाही आहे.’’