Virat Kohli Viral Video: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. रविवारी झालेल्या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि २५० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. यादरम्यान क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीला गोलंदाजी देण्याची मागणी केली. त्यानंतर विराटने दिलेल्या रिॲक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तशी वेगवान सुरूवात करता आली नव्हती. सुरवातीच्या ३ षटकात हव्या तितक्या धावा करता आल्या नव्हत्या. सॉल्टने ४६ धावा केल्या. तर विराटने १८ चेंडूत २८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला. पण अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर तो बाद होऊन माघारी परतला.
विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यात विराट कोहली गोलंदाजी करताना दिसून आला होता. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आव्हान खूप मोठं होत. त्यामुळे विराट गोलंदाजी करू शकला असता. ज्यावेळी विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी, चाहते ‘कोहली को बॉलिंग दो..कोहली को बॉलिंग दो.. ’ अशी मागणी करत होते. क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या मागणीनंतर विराटने लगेच प्रतिक्रिया दिली. तो इशाऱ्यात नाही असं म्हणताना दिसून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दमदार विजय
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना फिल सॉल्टने ४६ धावांची खेळी केली. विराट कोहलीने २८ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. तर शेवटी रजत पाटीदार ४८ आणि टीम डेव्हिड ७० धावांवर नाबाद राहिला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा डाव २०७ धावांवर आटोपला. यासह रॉयल चॅलेंजर्स संघाने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला.
