भारताचे क्रिकेटपटू विराट कोहली व मिताली राज यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. यापूर्वी त्याला २०१२मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी’कॉक, एबी डी’व्हिलिअर्स, डेल स्टेन यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिची वनडे व ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी शिफारस झाली आहे. तिला चालरेट एडवर्ड्स, स्टीफनी टेलर यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. मिचेल जॉन्सन व कुमार संगकारा यांची दुसऱ्यांदा सवरेत्कृष्ट खेळाडूसाठीच्या सर गारफिल्ड सोबर्स करंडकासाठी शिफारस करण्यात आली आहे. उदयोन्मुख खेळाडूसाठी इंग्लंडचे गॅरी बॅलन्स, बेन स्टोक्स न्यूझीलंडचे कोरी अँडरसन व जिमी नीशान यांची सर्वोत्तम उदयोन्मख खेळाडूच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कारांची अंतिम निवड १४ नोव्हेंबरला केली जाणार असून १५ नोव्हेंबरला त्यांना गौरवण्यात येणार आहे.