एकच लक्ष्य..

कोहली, रहाणेची नाबाद अर्धशतके
भारताकडे ४०३ धावांची आघाडी

‘विराट’ धावसंख्या उभारणे आणि चौथी कसोटी जिंकून मालिकेत ‘अजिंक्य’ रहाणे, हे ध्येय भारतीय संघाने जोपासले आहे. सूर गवसलेल्या कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८३ धावांची खेळी साकारून दिल्लीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकंदर आघाडी ४०३पर्यंत वाढवली आहे.
भारताने दुसऱ्या डावात ४ बाद १९० अशी दमदार मजल मारली आहे. मात्र याचे श्रेय जाते ते कोहली आणि पहिल्या डावातील शतकवीर अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी साकारलेल्या १३३ धावांच्या अभेद्य भागीदारीला. या मालिकेत प्रथमच ही शतकी भागीदारी साकारली गेली. फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला.
रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आणि दिवसअखेर ५२ धावांवर तो नाबाद राहिला. सकाळच्या सत्रात मुरली विजय (३), रोहित शर्मा (०), शिखर धवन (२१) आणि चेतेश्वर पुजारा (२८) असे दिग्गज फलंदाज लवकर माघारी परतल्यामुळे भारताची ४ बाद ५७ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मॉर्नी मॉर्केलने मुरली आणि रोहितला लागोपाठच्या षटकांमध्ये बाद करून भारताची २ बाद ८ अशी अवस्था केली. मग धवन-पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. मॉर्केलनेच धवनचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली.
सामन्याचा दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्यामुळे रविवारी उपाहारापर्यंत आघाडी ४५०-५०० धावांपर्यंत नेत भारत दुसरा डाव घोषित करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी एक मानहानीकारक पराभव टाळण्याची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रथमच ५०हून अधिक धावा काढणाऱ्या कोहलीने १५४ चेंडूंचा सामना करीत किल्ला लढवला आणि १० चौकारांसह आपले १२वे कसोटी अर्धशतक साकारले. कोहलीला कसोटी कारकीर्दीतील तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ११ धावांची आवश्यकता आहे.
रहाणेने कोहलीच्या तुलनेत अधिक शांतपणे फलंदाजी केली. त्याने १५२ चेंडूंत आपली खेळी उभारली. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १४६ चेंडू घेतले. कोहलीने मात्र ७० चेंडूंत अर्धशतक साजरे केले.
कोहलीची फलंदाजी रमणीय आणि ताकदवान फटक्यांनी युक्त अशी होती. ऑफ-स्पिनर डेन पीटला त्याने मनगटी फटक्यांची अदाकारी पेश करीत कव्हरला चेंडू सीमापार धाडला. मग कायले अ‍ॅबॉटच्या उजव्या यष्टीबाहेरील चेंडूवर त्याने थर्डमॅनला लाजवाब चौकार ठोकला. मग ८० धावांपर्यंत पोहोचताना मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर याच फटक्याची त्याने पुनरावृत्ती केली.
पुढील किमान सहा महिन्यांत भारताला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकणार नाही, याची कल्पना असलेल्या कोहलीने नियोजनपूर्वक फलंदाजी केली. अर्धशतक पूर्ण झाल्यावर शाळकरी मुलांच्या स्टँडला त्याने अभिवादन केले.

अजिंक्य रहाणे ५२*
चेंडू १५२
चौकार ५

विराट कोहली ८३*
चेंडू १५४
चौकार १०

धावफलक
भारत (पहिला डाव) : ३३४.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १२१
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. व्हिलास गो. मॉर्केल ३, शिखर धवन त्रि. गो. मॉर्केल २१, रोहित शर्मा त्रि. गो. मॉर्केल ०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ताहीर २८, विराट कोहली खेळत आहे ८३, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५२, अवांतर (लेगबाइज २, नोबॉल १) ३, एकूण ८१ षटकांत ४ बाद १९०
बाद क्रम : १-४, २-८, ३-५३, ४-५७
गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल १७-६-२९-३, कायले अ‍ॅबॉट १७-६-३८-०, डेन पीट १८-१-३८-०, इम्रान ताहीर २१-४-४९-१, डीन एल्गर ८-१-१९-०

जवळपास सहा महिने मी संघाबाहेर होतो. रणजी हंगामाच्या सुरुवातीचे तीन सामने राजकोटला झाले आणि ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने माझ्या खात्यावर चांगले बळी जमा झाले. नशिबाने अतिशय छान साथ मला दिली.
-रवींद्र जडेजा, भारताचा खेळाडू