ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय फलंदाजांनी आपली तयारी चोख झाल्याचे स्पष्ट करताना ९० षटकांत ३७५ धावा उभारल्या आहेत. ग्लिडरोल स्टेडियमवरील क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्धचा दोनदिवसीय सराव सामना भारताने अनिर्णीत राखला आहे. पहिल्या डावात पावणेचारशे धावा केल्यानंतर भारताने दिवसअखेपर्यंत यजमान संघाची दुसऱ्या डावात २१ षटकांत ५ बाद ८३ अशी अवस्था केली.
भारताने शुक्रवारी २ बाद ९९ धावसंख्येवरून डावाला प्रारंभ केला. प्रभारी कर्णधार विराट कोहली (६६) आणि मुरली विजय (६०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या दोन्ही फलंदाजांनी दिमाखदार अर्धशतके झळकावली. मग अजिंक्य रहाणे (५६) आणि रोहित शर्मा (४८) यांनी पाचव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. वृद्धिमान साहानेही अर्धशतक झळकावले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद करण्यात इशांत शर्माने सिंहाचा वाटा उचलला.  इशांतने ८ धावांत २ बळी घेतले. वरुण आरोन, उमेश यादव आणि कर्ण शर्मा यांनी त्याला सुरेख साथ देत प्रत्येकी एकेक बळी
घेतला.