मिचेल जॉन्सन आणि विराट कोहली यांच्यामध्ये सध्याच्या दौऱ्यातील वाग्युद्ध रंगताना दिसत असले, तरी एक खेळाडू म्हणून दोघांच्या मनात एकमेकांबद्दल चांगली भावना आहे. महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधारपदाची माळ कोहलीच्या गळ्यात पडली. कोहली हा भारतीय संघामध्ये आक्रमकता निर्माण करू शकेल, असे मत त्यानंतर जॉन्सनने व्यक्त केले
आहे.
 जॉन्सन पुढे म्हणाला की,‘‘भारतीय संघ हा बऱ्याच वेळेला आक्रमक जाणवला नाही, आक्रमकपणासाठी ते ओळखले जात नाहीत. पण कोहलीकडे पाहिले तर तो आक्रमक क्रिकेटसाठी ओळखला जातो. धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे निश्चितच धोनीपेक्षा कोहलीचे नेतृत्व नक्कीच वेगळे असले. तुम्ही जसे असता तसाच तुम्ही संघ घडवत असता, त्यामुळे कोहलीकडे असलेली आक्रमकता नक्कीच भारतीय संघातदेखील उतरेल.’’
समोर कोणताही प्रतिस्पर्धी संघ असला तरी कोहलीचा पवित्रा बदलणार नाही, असे जॉन्सनला वाटते. याबाबत जॉन्सन म्हणाला की, ‘‘समोर कोणता संघ आहे, याचा कोहलीवर कोणताही परिणाम होणार नाही. तो प्रतिस्पध्र्याच्या डोळ्याला डोळा भिडवूनच खेळेल. कोहलीने गेल्या तीन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे, पण आम्ही ही मालिका २-० अशी खिशात टाकली आहे, पण हा खेळाचा एक भाग आहे. चांगली कामगिरी होऊनही बऱ्याचदा पराभव पदरी पडतो.’’