भारताच्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटी ब्रँडचा मान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पटकावला आहे. यामध्ये त्याने बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान, सलमान खान यांनाही मागे टाकले आहे. अमेरिकेच्या ग्लोबल अ‍ॅडव्हाझरी फर्म डफ अ‍ॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार रनमशीन विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे १ हजार ६९१ कोटी रुपये इतकी आहे.

विविध उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या मानधनातील वाढ, क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी आणि एकंदरीत प्रसिद्धीमध्ये झालेली वाढ या गोष्टींचा विचार करून विराटची ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे. रोहित आणि सचिन तेंडूलकरपेक्षा विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू दहापटीने जास्त आहे. उप कर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू १६४ कोटी रूपये तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू १७९ कोटी रूपये आहे.

रनमशीन विराट कोहलीने ब्रँड व्हॅल्यूमध्ये बॉलिवूड स्टार शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, यासारख्या आघाडीच्या कलाकारांना मागे टाकले आहे. बँड व्हॅल्यूच्या बाबतीत विराट कोहली सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर आहे. एखाद्या ब्रँडसाठी किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता पहिली पसंती विराटला दिली जात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामागचे कारण म्हणजे विराट कोहलीची मैदानावरील कामगिरी आणि त्याच्या प्रसिद्धीत झालेली वाढ.

भारताचे टॉप बँड व्हॅल्यू असणारे स्टार

विराट कोहली- 237.5 मिलियन डॉलर

अक्षय कुमार- 104.5 मिलियन डॉलर

दीपिका पादुकोण- 93.5 मिलियन डॉलर

रणबीर सिंह- 93.5मिलियन डॉलर

शाहरुख खान- 66.1 मिलियन डॉलर

सलमान खान- 55.7 मिलियन डॉलर

एम.एस. धोनी- 41.2 मिलियन डॉलर

सचिन तेंडुलकर- 25.1 मिलियन डॉलर

रोहित शर्मा- 23 मिलियन डॉलर