आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाताचा बोलबाला पाहायला मिळाला. आधी गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना कमी धावांवर रोखलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फिन ॲलेनने नाबाद शतकी खेळी केली आणि कोलकाता नाईट रायडर्सला ३४ चेंडू शिल्लक ठेवून आणि ८ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १४३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या १३ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. तर अंगकृष रघुवंशी देखील १ धाव करून बाद झाला. शेवटी फिन ॲलेन आणि कॅमेरुन ग्रीनची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. दोघांनी मिळून दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. फिन ॲलेन १०० धावांवर नाबाद राहिला. तर कॅमेरुन ग्रीन नाबाद ३३ धावांवर राहिला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

दिल्लीने केल्या अवघ्या १४२ धावा

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेला केएल राहुल स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या २३ धावा करता आल्या. पथूम निसांका आणि केएल राहुलने मिळून पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. पथूम निसांका अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. त्यानंतर मधल्या षटकांमध्ये कुठलाही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. नितीश राणा अवघ्या ८, समीर रिझवी ३, ट्रिस्टन स्टब्स २ तर कर्णधार अक्षर पटेल अवघ्या ११ धावा करून माघारी परतला. शेवटी आशुतोष शर्माने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या बळावर दिल्लीने ८ गडी बाद १४२ धावा केल्या.

हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा या हंगामातील चौथा विजय आहे. ९ गुणांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. तर दिल्लीचा संघ ८ गुणांसह आठव्या स्थानी घसरला आहे.