कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या धोरणात्मक गडबडीमुळे कर्णधार तळाशी आणि संघ तुपाशी असं चित्र आहे. अजिंक्य रहाणेकडे कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा आहे. मात्र मानधनाच्या बाबतीत रहाणे अगदीच तळाशी आहे. अनेक नवखे खेळाडू आणि रहाणे मानधनाच्या बाबतीत समान पातळीवर आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजिंक्यला अशी वागणूक चाहत्यांसाठी क्लेशदायक आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२४ मध्ये आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. मात्र मानधनाच्या मुद्यावरून सहमती न झाल्याने कोलकाता संघव्यवस्थापनाने श्रेयसला रिटेन केलं नाही. कोलकाताने लिलावापूर्वी १२ खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये सुनील नरिन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमणदीप सिंग, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, अजिंक्य रहाणे, रोव्हमन पॉवेल, उमरान मलिक, मनीष पांडे आणि अनुकूल रॉय यांचा समावेश होता. लिलावात कोलकाताने २५.२ कोटी एवढी प्रचंड रक्कम मोजून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला ताफ्यात समाविष्ट केलं. चेन्नईने रिलीज केलेल्या मथिशा पथिराणासाठी कोलकाताने १८ कोटी रुपये मोजले. या दोघांनाही दुखापतींचं ग्रहण आहे. कॅमेरुन वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून सुरुवातीच्या सामन्यांमध्ये गोलंदाजी करू शकला नाही. यासंदर्भात कर्णधार अजिंक्य रहाणेला विचारले असता, याचं उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच देऊ शकेल असं सांगितलं. यावरून वादाला तोंड फुटलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्रीन रिहॅब प्रक्रियेचा भाग म्हणून गोलंदाजी करत नाहीये याचा कोलकाता संघव्यवस्थापनाला कल्पना आहे असं स्पष्ट केलं.

संघातल्या प्रमुख फलंदाजाला किंवा कर्णधाराला सर्वाधिक रक्कम मिळते. अष्टपैलू असूनही विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळणाऱ्या ग्रीनसाठी कोलकाताने तिजोरी रिती केली. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून पथिराणाला घेतलं पण तो अद्याप तरी आलेला नाही. आल्यावरही तो किती खेळू शकेल याविषयी साशंकता आहे. श्रीलंका क्रिकेट त्याला एनओसी देणार का हाही प्रश्न आहे. कॅमेरुन ग्रीनने गुरुवारी झालेल्या सामन्यात अखेर गोलंदाजी केली. परंतु दुखापतींची शक्यता लक्षात घेता तो संपूर्ण स्पर्धेत किती गोलंदाजी करू शकेल याविषयी साशंकता आहे. ग्रीनसाठी २५ कोटी रुपये मोजणारं कोलकाता व्यवस्थापन १८ खेळाडूंची मोट बांधणाऱ्या कर्णधार रहाणेला मात्र १.५ कोटी एवढंच मानधन देत आहे.

लिलावाच्या पहिल्या टप्प्यात रहाणे अनसोल्ड गेला होता. श्रेयस अय्यरला रिलीज केल्यामुळे कोलकातापुढे कर्णधार कोण हा यक्षप्रश्न होता. लिलावादरम्यान खरेदी केलेल्या खेळाडूंपैकी कोणी कर्णधार होऊ शकेल असा नव्हता. कोलकाताचा संघ कर्णधार खरेदी करायला विसरला असे मीम्स व्हायरल होऊ लागले. सुनील नरिन अनुभवी खेळाडू असला तरी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची मोट तो बांधू शकेल का याविषयी साशंकता होती. लिलावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात कोलकाताने अजिंक्य रहाणेला संघात घेतलं. भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या अजिंक्यकडे कोलकाताने नेतृत्वाची धुरा सोपवली.

Ajinkya Rahane
केकेआरच्या अपयशावर बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे

आयपीएलच्या व्यासपीठावर दाखल झालेल्या तेजस्वी दहियासाठी कोलकाताने ३ कोटी रुपये मोजले आहेत. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर अंगक्रिश रघुवंशीलाही तेवढंच मानधन मिळणार आहे. मानधनाच्या बाबतीत रहाणे १६व्या स्थानी आहे. अजिंक्यइतकंच मानधन टीम सैफर्ट आणि रोव्हमन पॉवेल यांना मिळणार आहे.

यंदाच्या हंगामातील आयपीएल कर्णधारांचं मानधन आणि रहाणेला देण्यात येणारं वेतन यातली तफावत अचंबित करणारी आहे. लखनौ सुपरजायंट्स कर्णधार ऋषभ पंतला २७ कोटी रुपये देणार आहे. पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटी रुपये मोजले आहेत. पॅट कमिन्स दुखापतीमुळे अद्याप खेळत नसला तरी सनरायझर्स हैदराबादने त्याकरता १८ कोटी रुपये खर्च केले आहेत. चेन्नईने १८ कोटी रुपये देऊन ऋतुराज गायकवाडला रिटेन केलं आहे. दिल्लीने अक्षर पटेलवर विश्वास ठेवत १६.५ कोटी रुपये अदा केले आहेत. गुजरातचा कर्णधार शुबमन गिलला प्रति हंगाम १६.५ कोटी रुपये मिळतात. हार्दिक पंड्यासाठी मुंबईने १६.३५ कोटी रुपये एवढी रक्कम बाजूला काढली आहे. युवा कर्णधार रियान परागसाठी राजस्थानने १४ कोटी रुपये दिले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिलंवहिलं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रजत पाटीदारसाठी बंगळुरूने ११ कोटी रुपये खर्च केले आहेत. या यादीत अजिंक्य रहाणे तळाशी असून कोलकाताकडून त्याला प्रति हंगाम अवघे १.५ कोटी रुपये मिळणार आहेत. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या मात्र टीम इंडियाचा मधल्या फळीतील आधारस्तंभ खेळाडूला इतकं कमी मानधन मिळणं चाहत्यांना खुपणारं आहे.

आयपीएल २०२६ कर्णधार मानधन

लखनौ सुपरजायंट्स- ऋषभ पंत (२७ कोटी)
पंजाब किंग्ज- श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स (१८ कोटी)
चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड (१८ कोटी)
गुजरात टायटन्स- शुबमन गिल (१६.५ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स-अक्षर पटेल (१६.५ कोटी)

मुंबई इंडियन्स- हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी)
राजस्थान रॉयल्स- रियान पराग (१४ कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- रजत पाटीदार (११ कोटी)
राजस्थान रॉयल्स- अजिंक्य रहाणे (१.५ कोटी)

रहाणेचा अनुभव

८५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी२० सामन्यात अजिंक्यने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत तब्बल २०२ सामन्यांचा अनुभव अजिंक्यकडे आहे. यामध्ये त्याच्या नावावर १२५.६०च्या स्ट्राईकरेटने ५१५६ धावा आहेत. अजिंक्यच्या नावावर आयपीएल स्पर्धेत २ शतकं आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स अशा सहा संघांचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल संघाच्या नेतृत्वाचाही प्रदीर्घ अनुभव अजिंक्यकडे आहे.

कोलकाताच्या नावावर तीन जेतेपदं

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या हंगामापासून आयपीएल स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे. शाहरुख खान आणि जुही चावला सहमालक असलेल्या या संघाचा प्रचंड असा चाहतावर्ग आहे. कोलकाताने २०१२, २०१४ आणि २०२४ मध्ये जेतेपदावर कब्जा केला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताने ऐतिहासिक जेतेपद साकारलं होतं. संघाचा भावी कर्णधार होऊ शकेल अशा शुबमन गिलला रिलीज करण्याचा अनाकलनीय निर्णय कोलकाताने घेतला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद पटकावूनही कोलकाताचा संघ त्याला रिटेन करू शकला नाही. त्यामुळेच कर्णधार कोण असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला.

दुखापतींचं ग्रहण, सक्तीचा आदेश

बांगलादेशातील राजकीय सामाजिक परिस्थितीमुळे बीसीसीआयने बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचा आदेश कोलकाता संघाला दिला. आदेशाचं पालन करत कोलकाताने मुस्ताफिझूरला रिलीज केलं. मुस्ताफिझूर हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निष्णात गोलंदाज मानला जातो. तो कोलकाता संघाचं प्रमुख अस्त्र असणार होतं. फिट असूनही मुस्ताफिझूर खेळू शकणार नाहीये. तब्बल ९ कोटी रुपये खर्चून कोलकाताने त्याला संघात घेतलं होतं. बीसीसीआयच्या निर्णयाचा मोठा फटका कोलकाताला बसला आहे. याव्यतिरिक्त हर्षित राणा आणि आकाशदीप हे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने कोलाकाताची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. यातच वरुण चक्रवर्तीच्या हाताला दुखापत झाल्याने कोलकाताच्या चिंता वाढल्या आहेत.