KKR vs DC Highlights: आयपीएल २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते, त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा गुणतालिकेवर फरक पडणार नव्हता. पण तरीदेखील दोन्ही संघांनी विजय मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावला. इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६३ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह दिल्लीने हा सामना ४० धावांनी खिशात घातला.
कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावा करायच्या होत्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला जशी सुरुवात हवी होती, तशी सुरुवात कर्णधार अजिंक्य रहाणेने करून दिली. त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ६३ धावांची खेळी केली. तर फिन ॲलेनने २० धावा केल्या. मनीष पांडे २५ धावा करून माघारी परतला. कॅमेरुन ग्रीन अवघ्या २ धावा करून माघारी परतला. रिंकू सिंग गोल्डन डकवर माघारी परतला. कोलकाताचा डाव १६३ धावांवर आटोपला.
दिल्लीने केल्या २०३ धावा
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. दिल्लीकडून अभिषेक पोरेल आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरवात करण्यासाठी मैदानात आली. या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. अभिषेकने २२ धावा केल्या. तर केएल राहुलने ६० धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या साहिल पारेखने २४ धावा केल्या. तर कर्णधार अक्षर पटेलने ३९ धावा चोपल्या. शेवटी डेव्हिड मिलरने २८ धावा केल्या. तर आशुतोष शर्माने नाबाद १८ धावा केल्या. यासह दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद २०३ धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत होता. पण मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफची संधी हुकली. जर मुंबईने हा सामना जिंकला असता, तर कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर धावांचं समीकरण होतं, पण असं काहीच झालं नाही. त्यामुळे हा सामना जिंकूनही कोलकाताला प्लेऑफपासून वंचित राहावं लागलं असतं. शेवटी दिल्लीने विजयाने हंगामाचा शेवट केला आहे.
