Kolkata Knight Riders vs Punjab Kings Weather Update: अजिंक्य रहाणेच्या नेृत्वाखाली खेळत असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अजूनही आयपीएल २०२६ स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. घरच्या मैदानावर खेळताना कोलकाताचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलकात्याती इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे धुतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घ्या सामन्यावेळी कसं असेल हवामान.
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध पंजाब किंग्ज सामना रद्द होणार?
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान पाऊस हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामना रद्द होऊ शकतो किंवा डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावला जाऊ शकतो. गेल्या हंगामातही कोलकाता नाईट विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २० षटकांअखेर २०१ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला अवघ्या ७ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून गुरूवारपर्यंत पाऊस आणि वादळाचे सत्र सुरू राहू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान गारपीट आणि वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आज होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही संघ रविवारी सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. पण पावसामुळे दोन्ही संघांना सराव सत्र रद्द करावे लागले होते. खेळपट्टीवर कव्हर्स होते, पण मैदानावर अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते. ५-५ षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाईम हा १० वाजून ४६ मिनिटे इतका असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्ज संघाने दमदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर २ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने चेन्नई सुपर किंग्जवर ५ गडी राखून विजय मिळवला होता. आता पंजाब किंग्जचा संघ विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
