बांगलादेशने डार्विन कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची किमया केली. बांगलादेशचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच कसोटी विजय आहे. तब्बल २३ वर्षांनंतर बांगलादेशला ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली. हसन महमूद, तांझिड हसन आणि मेहदी हसन मिराझ यांच्यासह दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह बांगलादेशने खळबळजनक विजयाची नोंद केली. बांगलादेशने याआधी झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशात कसोटी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं अत्यंत अवघड मानलं जातं. बांगलादेशने ते शक्य करून दाखवलं आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला दणका देणाऱ्या संस्मरणीय लढतींमध्ये या सामन्याचा समावेश होईल. व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंग, हर्षेल गिब्ज यांच्या मांदियाळीत आता बांगलादेशच्या खेळाडूंनी स्थान पटकावलं आहे.
२००१ कोलकाता, लक्ष्मण-द्रविडची मॅरेथॉन भागीदारी
ऑल टाईम ग्रेट टेस्ट मॅचेस मध्ये अव्वल ५ मध्ये गणना होणारा हा सामना. स्टीव वॉच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने ऑक्टोबर १९९९ ते फेब्रुवारी २००१ या कालावधीत सलग १६ कसोटी सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाचा विजयरथ प्रतिस्पर्धी संघाना चिरडून वर्चस्व गाजवत असे. कोलकाता कसोटीतही तसंच चित्र होतं मात्र राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावांची मजल मारली. स्टीव वॉ याने शतकी खेळी साकारली. मॅथ्यू हेडनचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. हरभजन सिंगने ७ विकेट्स घेतल्या.
भारताचा पहिला डाव १७१ धावांतच गडगडला. लक्ष्मणने ५९ धावांची खेळी केली. मोठी आघाडी हातात असल्याने ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात २३२/४ या स्थितीत हा निर्णय योग्य वाटत होता. मात्र यानंतर जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली नव्हती. लक्ष्मण आणि द्रविड यांनी चौथ्या विकेटसाठी ३७६ धावांची भागीदारी केली. एक संपू्र्ण दिवस या दोघांनी गाजवला. लक्ष्मणने पाठदुखी बळावलेली असतानाही ४४ चौकारांसह २८१ धावांची खेळी केली तर अंगात ताप असताना द्रविडने १८० धावा केल्या. अद्भुत अशा या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसरा डाव ६५७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचं लक्ष्य मिळालं. हरभजनच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने लोळण घेतली. त्यांचा डाव २१२ धावांतच आटोपला. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या वर्चस्वाची ही नांदी ठरली.
२००५ बांगलादेशने दिला दणका, अशरफुलची शतकी खेळी
लिंबूटिंबू अशी गणना होणाऱ्या बांगलादेशने इंग्लंडमध्ये आयोजित तिरंगी स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट आणि रिकी पॉन्टिंग हे मोठं योगदान देऊ शकले नाहीत. डेमियन मार्टिन (७७) आणि मायकेल क्लार्क (५४) यांनी अर्धशतकी खेळी साकारल्या. माईक हसीने ३१ तर सायमन कॅटिचने ३६ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाने २४९ धावांची मजल मारली. बांगलादेशतर्फे तापाश बैश्यने ३ विकेट्स पटकावल्या. बांगलादेशची सुरुवातही अडखळत झाली. मात्र मोहम्मद अशरफुलने शतकी खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. अशरफुलने ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी, मायकेल कॅस्प्रोविझ यांचा समर्थपणे सामना केला. हबिबूल बाशरने ४७ धावांची खेळी करत अशरफुलला चांगली साथ दिली. अशरफुलने ११ चौकारांसह १०० धावांची खेळी केली. अशरफुल बाद झाल्यानंतर आफ्ताब अहमदने १३ चेंडूत २१ धावांची खेळी करत बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अशरफुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने या पराभवातून बोध घेत तिरंगी स्पर्धेची फायनल गाठली मात्र तो सामना टाय झाला. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला जेतेपद विभागून देण्यात आलं.
२००६, जोहान्सबर्ग, विश्वविक्रमी सामना
२० वर्षांनंतरही युट्यूबवर वारंवार पाहिला जाणारा सामना असं याचं वर्णन होतं. जोहान्सबर्गच्या वॉंडरर्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने ४३४ धावांचा डोंगर उभारला. त्यावेळी वनडे क्रिकेटमधली ती सर्वोच्च धावसंख्या होती. कर्णधार रिकी पॉन्टिंगने १३ चौकार आणि ९ षटकारांसह १६४ धावांची खेळी केली. अॅडम गिलख्रिस्ट (५५), सायमन कॅटिच (७९), माईक हसी (८१) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. पुढच्या तीन तासात दक्षिण आफ्रिकेने निव्वळ अफलातून असा विजय साकारला. हर्षेल गिब्जने २१ चौकार आणि ७ षटकारांसह १७५ धावांची मॅरेथॉन शतकी खेळी केली. कर्णधार ग्रॅमी स्मिथने ९० धावा करत त्याला चांगली साथ दिली. फिनिशरची भूमिका निभावत मार्क बाऊचरने नाबाद ५० धावांसह आफ्रिकेला न भूतो ना भविष्यति विजय मिळवून दिला.
२००७ झिम्बाब्वे, ब्रेंडन टेलरने काढलं चोपून
वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया हे वेगळंच समीकरण आहे. ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली कामगिरी अचंबित करणारी आहे. मात्र पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने त्यांना नमवण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाने या लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना १३८ धावा केल्या. अँड्यू सायमंड्सने ३३ तर ब्रॅड हॉजने ३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्रेंडन टेलरने ४५ चेंडूत ६० धावांची खेळी करत झिम्बाब्वेला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
२०११ वर्ल्डकप, युवी ठरला भारी
वनडे वर्ल्डकप म्हणजे ऑस्ट्रेलियाची सद्दी असं समीकरण. २०११ वर्ल्डकपमध्ये मात्र भारताने ऑस्ट्रेलियाला गाशा गुंडाळायला लावला. रिकी पॉन्टिंगच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २६० धावा केल्या. रवीचंद्रन अश्विन, झहीर खान आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांनी अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात करून दिली. युवराज सिंगने ८ चौकारांसह नाबाद ५७ धावांची खेळी करत भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला. सुरेश रैनाने ३४ धावा करत युवराजला चांगली साथ दिली. अर्धशतक आणि २ विकेट्स पटकावणाऱ्या युवराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
