पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित ‘फिडे’ महिला ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यात भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने विजेतेपद पटकावले. ‘अमनोरा द फर्न’ येथे झालेल्या स्पर्धेत बुधवारी अखेरच्या फेरीत हम्पीने नुरग्युल सालिमोव्हा, तर चीनच्या झू जिनेरने पोलिना शुवालोवावर विजय मिळवला. हम्पी आणि जिनेर या दोघींचेही प्रत्येकी सात गुण झाले. मात्र, विजेतेपदाचा निर्णय टायब्रेकर गुणांवर हम्पीच्या बाजूने लागला. असे असले विजेतेपदाची पारितोषिक रक्कम आणि प्रत्येकी ११७.५ ग्रांप्री मानांकन गुण विभागून देण्यात आले. ग्रांप्रीचा अखेरचा टप्पा आता पुढील महिन्यात ऑस्ट्रियात होणार आहे. पुण्यातील टप्प्यात थेट प्रवेश मिळालेली दिव्या देशमुख ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.

हम्पी आणि नुरग्युल यांच्यातील डावाची सुरुवात स्लाव्ह बचाव पद्धतीने झाली. मात्र, हम्पी सुरुवातीपासून आक्रमक पवित्र्यात होती. तिने आपला उंटाचा मोहरा नुरग्युलच्या राजाशेजारी नेऊन ठेवत तिला कॅसलिंगची संधी दिली नाही. अशा वेळी नुरग्युलने १६व्या चालीला धोका पत्करून हत्ती पुढे आणला. अर्थात, हम्पीवर या चालीचा काही परिणाम झाला नाही. तिने १९व्या चालीलाच नुरग्युलच्या राजावर दडपण आणले. हम्पीने अखेरीस ८४ चालीनंतर विजय मिळवला. दुसऱ्या पटावर जिनेरने इटालियन ओपनिंग पद्धतीने झालेल्या डावात पोलिनाचा ७६ चालीत पराभव केला.

या स्पर्धेच्या सहा टप्प्यानंतर दोन खेळाडू कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून, यात अॅलेक्सेंड्रा गोरयाचकिना हिने ३०८.८ गुणांसह आपला प्रवेश निश्चित केला आहे. हम्पी २७९.१७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.